पोषण महिना अभियानात सर्वांनी सहभाग घेण्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 29 : ‘सही पोषण देश रोशन’, प्रत्येक घर पोषण उत्सव या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव अशा पोषण महिना अभियानात सहभाग घेऊन आपले राज्य कुपोषणमुक्त करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे केले.


केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि.1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर राज्यात पोषण आहार महिना म्हणून राबविण्यात येणार आहे. या महिन्यात करावयाच्या उपक्रमाबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने सर्व स्तरावर कार्यवाही सुरु आहे.


पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत प्रभात फेरी, 0 ते 6 वयोगटातील बालकांचे वजन घेऊन छाननी करणे, ग्रामस्तरावर बेटाबेटी याबाबत सांख्यिकी दर्शवणारे फलक लावणे, बेटी बचाव बेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकांचे आयोजन तसेच पोषण विषयावर अंगणवाडी मध्ये चित्रफित दाखवणे आदी उपक्रम होतील. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत ग्राम आरोग्य, स्वच्छता पोषण दिवसाचे आयोजन करणे, महिलांसाठी आयुष्यतर्फे योगाचे आयोजन, आशा, अंगणवाडी सेविका बचतगट यांच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्यांची जनजागृती करण्यासाठी एकत्रित गृह भेट घेणे. अंगणवाडीच्या इमारतीमध्ये स्वच्छतागृहासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करणे आदी उपक्रम या आठवड्यात राबविण्यात येणार आहेत.


तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान अंगणवाडी स्तरावर पोषण मेळावे आयोजन करणे यामध्ये आरोग्य व पोषण या विषयांचे प्रदर्शन भरवणे, सुदृढ बालक स्पर्धा, विविध फळांच्या पोषकासह बालकांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पथनाट्य, शालेय निबंध स्पर्धांचे आयोजन करणे यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन रक्तक्षय मुक्त भारत, बेटी बचाव बेटी पढाओ या विषयावर स्टॉल उभारणे आदी उपक्रम या आठवड्यात राबविण्यात येणार आहेत. तर चौथ्या आठवड्यात म्हणजे 24 ते 29 सप्टेंबर या दरम्यान समुदाय आधारित कार्यक्रम आयोजित करणे, प्रभात फेरी, किशोरवयीन मुलांसाठी जनजागृती शिबिर आयोजित करणे, गट अथवा ग्राम स्तरावर अभिसरण कृती आराखड्याबाबत आढावा घेण्यात आणि अहवालाचे एकत्रीकरण करणे आदी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पोषण महिन्याचा समारोप अहवाल ग्रामसभेत करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा