वंचितांच्या कल्याणासाठी लोकसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची-देवेंद्र भुजबळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सेवानिवृत्तीनिमित्त मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचा सत्कार
औरंगाबाद, दि. 31 -  शासकीय सेवेत कार्य करताना शासन सर्व सुविधा लोकसेवकांना देते. या सुविधा जनतेच्या पैशातूनच मिळतात. शासनाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविणे, जनतेचे कल्याण करणे या दुहेरी जबाबदाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना लोकसेवक म्हणून उत्तमरीतीने पार पाडाव्या लागतात, असे मत मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागीय माहिती कार्यालयात श्री. भुजबळ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यालयीन निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी अलका भुजबळ, कन्या देवश्री भुजबळ, लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माहिती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

श्री. भुजबळ म्हणाले, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून यशाकडे वाटचाल केली. अपयशाला सामोरे गेलो. परंतु अपयशामुळे  खचलो नाही. दूरदर्शनच्या सहा वर्षाच्या आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या साडेसव्वीस वर्षाच्या सेवेत लोकांकडून प्रेरणा घेतली. लोकांना प्रेरित केले. सामान्य माणसेही प्रेरणास्त्रोत असू शकतात, हे गगनभरारी पुस्तकातून लोकांसमोर आणले. शासकीय सेवा बजावताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. परंतु आपले ध्येय लोककल्याणाचेच असावे. लोकांचा शासनाच्या योजना, उपक्रमात सहभाग वाढावा, यासाठी सातत्याने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर आतापर्यंतच्या वाटचालीत माहिती व जनसंपर्कातील सर्व व्यक्तींच्या सहकार्यामुळेच यशाचा पल्ला गाठू शकलो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. भुजबळ यांच्या एकूणच कार्यशैलीबाबत श्री. भंडारे यांनी सविस्तर विवेचन केले. यामध्ये त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आदर्शवत व्यक्तिमत्व, दूरदर्शन, वृत्तपत्रातील कामाचा दीर्घ अनुभव, जनसंपर्क क्षेत्रातील संबंध याबाबतही श्री. भुजबळ यांच्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यांच्या कार्याचा इतरांनाही आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. तसेच औरंगाबाद, लातूर विभागाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांच्या हातून या पुढील काळात समाजासाठी लेखन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

श्रीमती अलका भुजबळ यांनीही श्री. भुजबळ यांच्याबद्दल बोलताना अत्यंत खडतर आयुष्यातून त्यांनी यशोशिखर गाठले आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी विभागाच्या वतीने भुजबळ दाम्पत्याचा औरंगाबाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन श्री. भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच छायाचित्रकार जॉन चार्ल्स यांनी फोटो अल्बम श्री. भुजबळ यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमात युनुस अलम सिद्दीकी, एन. आर. इनामदार, विलास सरोदे, श्री. चिलवंत, श्रीमती वंदना थोरात, श्याम टरके, यशवंत सोनकांबळे, संजय परदेशी, कैलास म्हस्के, सुभाष पवार,संजय परदेशी, अशोक खरात यांनी श्री. भुजबळ यांच्या कार्याबाबत, सहवासाबाबत मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी जाधव यांनी केले. आभार श्री. चिलवंत यांनी मानले.

विविध संपादक, पत्रकार, संघटनांच्या वतीने सत्कार

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या वतीने श्री. भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सुधाकर भारती, रामचंद्र देठे,  वनिता मोरे, सिडकोचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी  दिलीप वाटाणे, पत्रकार स.सो. खंडाळकर, किशोर महाजन, भगवान शहाणे, सुरेश क्षीरसागर, सुग्रीव मुंडे, सुमन खवसे, संजय हिंगोलीकर, रमेश जाबा, रमेश खोत, प्रवीण बुरांडे, वसंत बनसोडे, गणेश पवार, जब्बार खान, पद्मकुमार जैन, जॉन भालेराव, शुभम त्रिभुवन, शंभुराजे विश्वासू, संतोष ढगे, शेख सईद, शेख अन्वर, अब्दुल गनी शेख, सुरेश गायकवाड, सय्यद रफिक, सय्यद नदीम, सुरेश क्षीरसागर आदींसह विभागातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संघटनांनी श्री. भुजबळ यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा