निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना पदोन्नती दिली नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
पोलीस महासंचालक कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. २९ : निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या पदोन्नतीसंबंधात विविध वृत्त वाहिन्यांवर दाखवित असलेली बातमी वस्तुस्थितीदर्शक नसून श्री.कुरुंदकर यांना कोणतीही पदोन्नती दिली नसल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.

सहायक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नतीसाठी नियमाप्रमाणे पोलीस निरीक्षक पदाच्या 1 जानेवारी 2018 च्या सेवाज्येष्ठता यादीतील पहिल्या 400 अधिकाऱ्यांची सद्य:स्थितीची म्हणजे त्यांचे गोपनीय अहवाल, दाखल गुन्हे, विभागीय चौकशी, इतर सेवा विषयक बाबी इत्यादीची माहिती मागविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्री.कुरुंदकर यांचे नावही या चारशे जणांच्या यादीत आहे. याचा अर्थ श्री.कुरुंदकर यांना पदोन्नती दिली असा होत नाही. फक्त माहिती मागविण्यात आली असून अद्याप निवड सूची तयार करण्यात आलेली नाही किंवा पदोन्नतीबाबत अद्याप विचार केलेला नाही.

या यादीतील सेवेत असलेले, निलंबित तसेच मृत व निवृत्त अधिकाऱ्यांची अद्ययावत माहिती मागविण्यात येते. जमा झालेली माहिती पदोन्नती समितीच्या बैठकीत ठेवण्यात येते. व त्यावेळी निवड सूची (select list) बनविताना निलंबित, मृत व निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची तसेच गुन्हे दाखल असलेले अधिकारी यांची नावे वगळून इतर अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार पदोन्नतीसाठी समिती करत असते.


त्यामुळे श्री.कुरुंदकर यांना पदोन्नती दिल्याची बातमी वस्तुस्थितीला धरून नाही, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने श्री.व्हटकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा