रायगडला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्राची केंद्रासोबत भागीदारी - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली, दि. ३१ : रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनासोबत भागीदारी करणार असल्याची, माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

श्री. रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासंदर्भात चर्चा झाली.

महाराष्ट्रातील जनतेसाठी रायगड किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जगभर मांडण्यासाठी या किल्ल्याचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनासोबत मिळून काम करणार असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

केंद्र शासनाने रायगडच्या नूतनीकरणासाठी पहिला टप्प्याचा निधी म्हणून 60 कोटी रूपये दिलेले आहेत.  महाराष्ट्रातील  किल्ले हे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतात. भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यात सामंजस्य ठेवून रायगड किल्ल्याचा विकास करण्यात येईल, अशी चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची, माहिती श्री. रावल यांनी आज दिली.

औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध अंजठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी देशी-विदेशी  पर्यटक येतात. येथील तिकीट केंद्राची जागा बदलून हे केंद्र  इंडो-जपान केंद्रात सुरू करण्यात यावे, अशी मागणी आज राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे केली.

भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने अंजठा-वेरूळ लेण्यांजवळ इंडो-जपान केंद्र उभारण्यात आलेले आहे. या केंद्रालाही पर्यटकांनी भेट द्यावी यामागचा हा उद्देश असल्याचे सांगितले. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री यांनी यावर सकारात्मकता दर्शविल्याचे, श्री. रावल यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा