आशयघनता टिकवीत मराठी चित्रपटसृष्टीची घौडदौड सुरू- मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


55 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे दिमाखात वितरण

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपसृष्टीची आई आहे. अनेक भाषेतील चित्रपट यश मिळवत असताना मराठी चित्रपटसृष्टीनेही व्यावसायिक घौडदौड सुरु ठेवत आपली आशयघनता टिकवल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

55 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार सर्वश्री सुनील शिंदे, प्रसाद लाड, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल, वरळी येथे हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक ताकदीच्या कलाकरांना गौरविण्याची, त्यांचे अभिनंदन करण्याची संधी मिळाली आहे. सर्वांचे मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासात योगदान आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी महाराष्ट्र शासन अत्यंत खंबीरपणे उभे राहिल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून सुरु ठेवलेले प्रयत्न स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. संगीतकार अजय-अतुल यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे नाव सातासमुद्रापार नेल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.


यावेळी राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते श्री. धर्मेंद्र यांना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते गौरविण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार मराठी चित्रपट कलावंत तथा ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देण्यात आला. राज कपूर विशेष येागदान पुरस्कार हिंदीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते देण्यात आला. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना संगीतकार अजय–अतुल यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त कलावंतांनी मनोगते व्यक्त केली.


सांस्कृतिक कार्य विभागाच्या महासंस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन तसेच सोनी टीव्ही या मराठी दूरचित्रवाहिणीच्या व 98 व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेल्या कलावतांनाही गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा