आशयघनता टिकवीत मराठी चित्रपटसृष्टीची घौडदौड सुरू- मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


55 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे दिमाखात वितरण

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपसृष्टीची आई आहे. अनेक भाषेतील चित्रपट यश मिळवत असताना मराठी चित्रपटसृष्टीनेही व्यावसायिक घौडदौड सुरु ठेवत आपली आशयघनता टिकवल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

55 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार सर्वश्री सुनील शिंदे, प्रसाद लाड, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल, वरळी येथे हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक ताकदीच्या कलाकरांना गौरविण्याची, त्यांचे अभिनंदन करण्याची संधी मिळाली आहे. सर्वांचे मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासात योगदान आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी महाराष्ट्र शासन अत्यंत खंबीरपणे उभे राहिल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून सुरु ठेवलेले प्रयत्न स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. संगीतकार अजय-अतुल यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे नाव सातासमुद्रापार नेल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.


यावेळी राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते श्री. धर्मेंद्र यांना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते गौरविण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार मराठी चित्रपट कलावंत तथा ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देण्यात आला. राज कपूर विशेष येागदान पुरस्कार हिंदीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते देण्यात आला. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना संगीतकार अजय–अतुल यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त कलावंतांनी मनोगते व्यक्त केली.


सांस्कृतिक कार्य विभागाच्या महासंस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन तसेच सोनी टीव्ही या मराठी दूरचित्रवाहिणीच्या व 98 व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेल्या कलावतांनाही गौरविण्यात आले.

नवनियुक्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी स्वीकारला पदभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी त्यांच्या पदाची सुत्रे श्री.जैन यांच्याकडे सुपूर्द केली.

भारतीय प्रशासन सेवेतील १९८३ च्या तुकडीचे अधिकारी असलेले श्री.जैन हे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पहात होते. मुख्य सचिवांच्या दालनांत आज सायंकाळी श्री.जैन यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली. यावेळी श्री.मल्लिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर.ए. राजीव आदी उपस्थित होते.

कृषिक्षेत्राच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणार- डी. के.जैन

कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असून राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातील, असे नवनियुक्त मुख्य सचिव श्री. जैन यांनी यावेळी सांगितले.

मुख्य सचिव जैन यांचा अल्पपरिचय
  
दिनांक २५ जानेवारी,१९५९ रोजी जन्मलेले श्री.जैन हे मुळचे जयपूर, राजस्थान येथील आहेत. एम.टेक. मॅकॅनिकल इंजिनिअर, एम.बी.ए. असे त्यांचे शिक्षण झाले आहे. राज्य शासनाच्या प्रशासनात त्यांनी आतापर्यंत महत्वाच्या पदांवर काम केले असून त्यांची पहिली पदस्थापना १९८४ मध्ये धुळे येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर १९८५ मध्ये नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी, १९८७ मध्ये विक्रीकर उपायुक्त, १९९० मध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९२ मध्ये अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर येथे ते कार्यरत होते. १९९२ मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९५ मध्ये केंद्र शासनाच्या सेवेत त्यांची नियुक्ती झाली. २००२ मध्ये नियोजन विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.

यु.एन.आय.डी.ओ. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यक्रम संचालक म्हणून २००२ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध ऑटोमोबाईल्स कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले, मॅन्युअल्स लिहिली. कारखान्यांमध्ये उत्पादन करतानाच उत्पादित माल योग्य प्रकारे कसा होईल, यादृष्टीने काम केले. २००७ मध्ये राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००८ ते २०११ या कार्यकाळात केंद्र शासनात पंचायत राज मंत्रालयाचे सह सचिव म्हणून त्यांनी काम केले. श्री.जैन यांनी नरेगा-मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या कामाची दखल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतली होती आणि श्री.ओबामा यांनी श्री.जैन यांना यासंदर्भात निमंत्रण देऊन त्यांना चर्चेसाठी बोलाविले होते.

२०१५ मध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दिनांक २९ एप्रिल, २०१६ पासून ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले श्री.जैन यांना ट्रेकींग आणि वाचनाची आवड आहे.

राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नवी दिल्ली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रधान सचिव तथा गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


              महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही यावेळी त्यांना अभिवादन केले. 

मुंबई व‍िद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
 
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
           
यावेळी श्री.तावडे म्हणाले, मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक वाढून विद्यापीठाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शासनामार्फत आर्थिक व प्रशासकीय पाठिंबा देण्यात येईल. नवनियुक्त कुलगुरूंकडून शासनाच्या भरपूर अपेक्षा असून त्या ते समर्थपणे पूर्ण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
           
यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित असलेले निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून डॉ.पेडणेकर म्हणाले की, नॅक ॲक्रीडिटेशनची पूर्तता करणे, विद्यापीठातील रिक्त जागा भरणे, कामाची विभागणी करणे आदी कामांचा प्राधान्याने निपटारा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्राचार्य, शिक्षक यांच्याशी समन्वय साधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.तावडे यांनी नवनियुक्त कुलगुरुंना ‘यू कॅन वीन’ आणि ‘तुकाराम दर्शन’ ही पुस्तके भेट दिली.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, प्रधान सचिव महेश झगडे आदींनीही यावेळी श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प वाहून आदरांजली वाहिली.