सोनोग्राफी केंद्र चालविणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना प्रशिक्षण व परीक्षा घेण्यासाठी समिती स्थापन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

तीन महिन्यात कार्यवाही करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश 

मुंबई, दि. ३१: सोनोग्राफी केंद्र चालविणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परीक्षा प्रशिक्षण घेण्याकरिता राज्यात तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. या माध्यमातून तीन महिन्यात परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच नर्सिंगहोम तपासणीची धडक मोहीम पुन्हा हाती घेऊन १५ मेपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिले.

प्रसूतीपूर्व गर्भ लिंग निदान चाचणी प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत राज्य समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. या बैठकीस समिती सदस्य आमदार डॉ. भारती लव्हेकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त व अभियान संचालक संजीव  कुमार, आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक अर्चना पाटील, अनुजा गुलाटी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, सोनोग्राफी केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरांचे तांत्रिकदृष्ट्या श्रेणीवर्धन व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अशा डॉक्टरांचे प्रशिक्षण व परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात अशी परीक्षा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे तज्ज्ञ, रेडिऑलॉजिस्ट यांची समिती स्थापन करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील तीन महिन्यांमध्ये कार्यवाही करायची आहे. सोनोग्राफी केंद्र चालविणाऱ्या डॉक्टरांना शासकीय अथवा महापालिकेच्या रुग्णालयात प्रशिक्षण घेण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


गेल्या वर्षी नर्सिंग होम तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात ६६०० नर्सिंग होमच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे नोटीस देण्यात आल्या होत्या. या नर्सिंगहोमनी कागदपत्रांची पूर्तता केली की नाही या साठी पुन्हा एकदा धडक मोहीम हाती घ्यावी. १५ मेपर्यंत यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जुने सोनोग्राफी मशीन स्क्रॅप करण्यासाठी कार्यपद्धती काय असावी याबाबत मार्गदर्शक तत्वे तातडीने जाहीर करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा