पासपोर्टधारकांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु करणार- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र नगर कार्यालयाचे उद्घाटनअहमदनगर, दि. ३१ - सुमारे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात केवळ ६ टक्के नागरिक पासपोर्टधारक आहेत. ही संख्या वाढावी, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत १८० नवीन पासपोर्ट कार्यालय सुरु केले आहेत. नागरिकांना सुलभरित्या पासपोर्ट मिळावा आणि नागरिकांची लूट करणारे एजंट या प्रक्रियेपासून लांब रहावेत, यासाठी कडक नियम व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पासपोर्टधारक व्हावे व देशाच्या विकासात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. 

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र नगर कार्यालयाचे उद्घाटन जनरल पोस्ट ऑफिस कार्यालयात  खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. मुळे बोलत होते. याप्रसंगी  खासदार सदाशिव लोखंडे. महापौर सुरेखा कदम, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी (पुणे) अनंत ताकवाले, आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी डॉ. मुळे म्हणाले, नगरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे, यासाठी खासदार दिलीप गांधी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करत होते. यासाठी त्यांचा विशेष पाठपुरावा होता.  त्यामुळे दिल्लीकडून अहमदनगरला ही छोटीशी भेट म्हणून पासपोर्ट कार्यालय सुरु करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

यावेळी खासदार गांधी म्हणाले, नगरमधून परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांना पासपोर्ट काढण्यासाठी या आधी पुण्याला ये-जा करावी लागत असे. आता नगर शहरात हे कार्यालय सुरु केल्याने शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळामध्ये व कमीतकमी कागदपत्रांमध्ये नागरिकांना पासपोर्ट उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा सर्वात जास्त पासपोर्ट धारक नागरिक असलेला जिल्हा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

खासदार गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध लोकाभिमुख कामे सुरु केली आहेत. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी विदेश मंत्रालयाचा कारभार हातात घेतल्यानंतर मोठ्या वेगाने कामे सुरु केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात पासपोर्ट कार्यालये सुरु केली जात आहेत.

खासदार लोखंडे म्हणाले, राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र सर्वात मोठे आहे. म्हणून या जिल्ह्यात पासपोर्ट सारखे महत्त्वाचे कार्यालय सुरु झाले ही चांगली बाब आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातही हे कार्यालय सुरु करावे. यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, नगरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे, ही लोकप्रतिनिधींची इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. नगर पासपोर्ट कार्यालयातून तत्पर सेवा मिळून जास्तीत जास्त नागरिकांचे पासपोर्ट होतील, अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी श्री. ताकवाले यांनी प्रास्तविकात पासपोर्ट कार्यालयामार्फत मिळणाऱ्या सेवेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत नरके यांनी केले तर आभार श्री. जतीन पोटे यांनी मानले.                                                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा