आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३१ : राज्यातील खेळाडूंना अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याची योजना क्रीडा संचालनालयामार्फत राबविण्यात येते. विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे, यांचेकडे दि. ७ फेब्रुवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, इत्यादीसाठी येणारा खर्च, देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क आणि आधुनिक क्रीडा साहित्य आयात/खरेदी करणे, गणवेश आदी साठी येणाऱ्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे.

ऑलिम्पिक गेम्सविश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, 8 ज्युनिअर विश्व अजिंक्य स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या सर्व स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ/क्रीडा प्रकारांचा समावेश असेत तेच खेळ/क्रीडा प्रकार वरील नमूद इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय असून कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद उपरोक्त शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.


याबाबत अधिक माहितीकरिता आपल्या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे, येथील दूरध्वनी संपर्क-020-27390371 विस्तारित क्र.214 कार्यालयाशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा