खासदार चिंतामण वनगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

 आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले
                                                     - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपालघर दि ३१ :- पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने जिल्ह्याच्या  सर्वांगीण विकासासाठी झटणारा, आदिवासींचा कैवारी, अभ्यासू खासदार, ज्येष्ठ आणि समर्पित असे  नेतृत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे मंगळवारी (दि.30 जानेवारी) दिल्ली येथे निधन झाले.  मूळ गावी, कवाडा येथे श्री.  वनगा यांच्या  पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. प्रारंभी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री  विनोद तावडे, पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री  विष्णू सवरा, गुजरातचे आदिवासी विकास राज्यमंत्री रमण पाटकर, सिल्व्हासाचे खासदार नटुभाई पटेल, खासदार रावसाहेब दानवे, खासदार कपिल पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, गणेश नाईक, सर्वश्री आमदार हितेंद्र ठाकूर आनंदभाई ठाकूरअमित घोडा,पास्कल धनारेविलास तरे, मनिषा चौधरीरविद्र फाटक ,संजय केळकर  ,माजी खासदार सिताराम गवळी,बळीराम जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांसह जिल्हा परिषद  सदस्य, पंचायत समिती  सदस्य, शासकीय अधिकारी कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले की खा. वनगा यांचे  निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावून जाणारे आहे. अथक संघर्ष करून त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते.  दुर्गम  भागात राष्ट्रीय विचार पेरण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.  वंचित, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे हाती घेतलेले काम समाजोपयोगी असेल तर त्यासाठी सदैव संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. पदाचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही. सोपविलेली पदे व जबाबदारी निष्ठेने पार पाडली . त्यांच्या  जाण्याने तयार झालेली पोकळी कधीही भरुन न येणारी आहे.

खासदार रावसाहेब दानवे यांनी राजकारणाच्याही पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्या  नेत्यांपैकी ते एक होते. अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वांनीच घेण्यासारखा आहे अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली.  यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, गुजरातचे  आदिवासी विकास मंत्री रमण पाटकर, खा. कपिल पाटील आ. मनीषा चौधरी, आ. संजय केळकरमाजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनीं  श्रद्धांजली वाहिली.
अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या कवाडा निवासस्थानी   ठेवण्यात आले होते. हजारो पालघर वासियांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा