नियमांच्या सुलभीकरणामुळे पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत वाढ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नवी दिल्ली : नियमांचे सुलभीकरण आणि पासपोर्ट विस्तार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे 2016 च्या तुलनेत यावर्षी देशात पासपोर्ट आवेदकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.

जटील नियम आणि पोलीस पडताळणीची दीर्घ प्रक्रिया आदी कारणांमुळे देशात पासपोर्टसाठी आवेदन करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. मात्र, विदेश मंत्रालयाने गेल्या दीड वर्षात नियमांचे सुलभीकरणआणि पासपोर्ट विस्तार कार्यक्रमांतर्गत देशभरात नव्याने सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे श्री. मुळे म्हणाले.

           आता पोलीस पडताळणी अडसर कमी
पोलीस पडताळणी हा पासपोर्ट आवेदनात सर्वात मोठा अडसर होता आता हा अडसर कमी त्रासदायक व्हावा यासाठी नियमांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. यानुसार पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र असल्यास पोलीस पडताळणीशिवाय लगेच पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार उल्लेख केलेली ओळखपत्र दाखविल्यानंतर लगेच पासपोर्ट उपलब्ध होणार असून यानंतर पोलीस पडताळणीची प्रकिया होणार आहे. पोलीस पडताळणी लवकर व्हावी यासाठी पोलिसांना एम ॲप देण्यात आले आहे.

पासपोर्ट आवेदनासाठी असे सुलभ झाले नियम
पासपोर्ट आवेदनासाठी यापूर्वी जन्म तारखेचा सरकारी दाखला अनिवार्य होता आता, हा नियम शिथील करण्यात आला आहे आणि अन्य दाखलेही ग्राह्य धरण्यात येतात. एखाद्या व्यक्तीस एकच पाल्य असल्याने अर्थात आई  किंवा  वडील असल्याने पासपोर्ट आवेदनात अडचण येत असे. आता अशा व्यक्तींसाठी सोय करण्यात आली आहे. साधु-सन्याशांना पासपोर्ट सहज मिळावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, पूर्वी आवेदनासाठी 15 जोडपत्र असायची आता ही संख्या 9 वर आणली आहे.आवेदनासाठी मध्यस्थांचा सहभाग काढून टाकण्यात आला आहे यानुसार, आता कुठल्याही प्रकारचे नोटरायजेशन  किंवा अटेस्टेशनची गरज नाही. आवेदक हा स्वत:च आपले कागदपत्र अटेस्टेड करू शकतो.         
                                               
देशात नवीन 251 पासपोर्ट सेवा केंद्र

देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी विदेश मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी” या तत्वानुसार देशभरात 251 पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पासपोर्ट विस्ताराच्या या कार्यक्रमामुळेही देशभरातून पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा