राज्य आपत्ती निवारण यंत्रणांची परिषद संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी होणार

मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून या प्रकल्पाअंतर्गत चक्री  वादळ पूर्व सूचना कार्यप्रणाली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याविषयी आज किनारी भागात आपत्ती निवारणाचे काम करणाऱ्या यंत्रणांची परिषद झाली.

मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक राजीव निवतकर, आसामचे आपत्ती निवारण विभागाचे तज्ञ व्ही. एन. मिश्रा, गुजरात आपत्ती निवारण कक्षाचे श्री. सरपोतदार, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट ऑफ इंडिया कंपनीच्या महाव्यवस्थापक शिवांगी सिन्हा आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या उभारणासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती गाडगीळ यांनी यावेळी केले. श्री. निवतकर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. तर श्री. सरपोतदार व श्री. मिश्रा यांनी त्यांच्या राज्यात राबविलेल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील सादरीकरण केले.

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत चक्री वादळाची पूर्वसूचना देणारी कार्यप्रणाली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. किनारी भागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांमध्ये ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी या जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्ष, पोलीस, अग्निशमन दल, नौदल, कोस्टल गार्ड, मेरी टाईम बोर्ड, शिपिंग कार्पोरेशन, बीएसएनएल व एमटीएनएल आदी शासकीय कार्यालयांचा सहभाग असणार आहे. ही यंत्रणा कशा प्रकारे उभारण्यात येणार आहे, त्याचा उपयोग कसा होणार आहे. यासाठी या कार्यालयाकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल या परिषदेत चर्चा करण्यात आली.या प्रकल्पानुसार पूर्वसूचना कार्यप्रणाली यंत्रणा उभारणे तसेच चक्री वादळाचे धोके निवारणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे, भूमीगत वीज पुरवठा केंद्र, खार प्रतिबंधक बंधारे मजबूत करणे आदींची कामे करण्यात येणार आहेत. या यंत्रणेमुळे संभाव्य चक्री वादळ येणार असल्याची पूर्व सूचना मिळणार आहे. ही सूचना संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला कोणत्या संवाद माध्यमाद्वारे पाठविता येईल जेणेकरून या आपत्तीच्या निवारणासाठी चांगल्या प्रकारे कामे करता येणार आहेत.
००००

नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./30.11.2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा