शिष्यवृत्तीची रक्कम १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी - प्रा. राम शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३१ : विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे निर्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिले. तसेच शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर आज प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. यावेळी महाडीबीटी पोर्टलसंदर्भात इन्वोव्हेव कंपनीचे प्रतिनिधी, राज्यस्तरावरील सर्व जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष प्रणालीच्या वापराची प्रात्यक्षिक घेण्यात आले व येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.

यावेळी विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, सहसचिव भा. रा. गावित, विजाभज संचालनालयाचे संचालक श्री. अहिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


प्रा. शिंदे यांनी सांगितले, मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जासंदर्भात राज्य शासनाने महाडीबीटीहे वेबपोर्टल सुरु केले आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल. या वेबपोर्टलवर अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रा. शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच विद्यार्थी किंवा शैक्षणिक संस्थाना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त संपर्क माध्यमे निर्माण करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा