इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम दोन महिन्यात सुरु करावे - राजकुमार बडोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३१ : इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यात सुरु करावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले.

इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत श्री.बडोले बोलत होते.

श्री.बडोले म्हणाले, स्मारकाच्या कामकाजासंदर्भात मागविण्यात आलेल्या निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या संदर्भात नव्याने अल्प कालावधी देऊन निविदा मागविण्यात येऊन ही प्रकिया पूर्ण करावी.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामकाज येत्या दोन महिन्यात सुरु करावे. इंदू मिल येथे स्मारकाची माहिती देणारे डिजिटल बोर्ड 6 डिसेंबर पूर्वी लावण्यात यावे. तसेच येथे स्मारकाची प्रतिकृती (मॉडल) ठेवावी. हे स्मारक जागतिक दर्जाचे करण्यात येणार असून या स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा राहणार असल्याने याचे काम उत्तम रितीने व्हावे, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. बडोले यांनी यावेळी दिल्या.

या स्मारकाच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बैठकीस विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, स्मारकाचे आर्किटेक्ट शशी प्रभू, एमएमआरडीएचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
००००

विष्णू काकडे/वि.सं.अ./31.10

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा