शेततळ्यामुळे वाढले शांताराम कटके यांच्या शेतीचे उत्पन्न (विशेष वृत्त)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेलं "भिवरी" हे गाव! कानिफनाथ मंदिरासाठी  प्रसिध्द असलेलं बोपदेव गाव हे या भिवरी गावाला लागूनच आहे.  गाव डोंगराळ भागात असल्यामुळं जमिनही खडकाळ! शिवाय पावसाचं प्रमाणही कमी! त्यामुळं शेतक-यांचं शेतउत्पादनही मर्यादितंच होत असे. परंतु राज्य शासनाच्या योजनेंतर्गत आपल्या शेतात शेततळं घेतल्यामुळं या गावच्या शांताराम कटके यांच्या शेतीचं  उत्पादन वाढण्यास मदतच झाली आहे.

पुणे जिल्हयातील दौंड आणि पुरंदर तालुक्याचा बराचसा भाग डोंगराळ असल्यामुळं ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांबरोबरच हरभरा, मूग, मटकी, हुलगा ही पिकंही इथं घेतली जातात.! पावसाचं प्रमाण आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करुन कांदा, मका अशी पिकंही या भागात घेतली जातात. डोंगराळ भाग.. त्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळं गावकऱ्यांसाठी भिवरी व आसपासच्या गावात एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. पावसाचं प्रमाण अनिश्चित आणि अल्प असल्यामुळं शेतीबरोबरच शेतीवर आधारित जोडधंद्यांवर इथले शेतकरी अवलंबून रहात. तसेच अर्थार्जनासाठी कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय अशा जोडधंद्यांवर गावकरी भर देतात. शासनाच्या विविध योजना राबवून या भागातील शेतक-यांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. याच भागातील श्री. शांताराम कटके यांनीही राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधली आहे.

भिवरीचे सर्वसामान्य शेतकरी असणा-या 60 वर्षीय श्री.शांताराम तुकाराम कटके यांची 5 एकर  जिरायती शेती आहे. पावसाच्या भरवश्यावर ते ज्वारी, मका अशी पीके घेत असत. पुरंदरच्या या भागात पावसाचं प्रमाण तसं अल्पच! त्यामुळं उन्हाळयात शेतीसाठी पाणी कमी पडत होत. पावसाच्या लहरीपणामुळं आणि  पाणी टंचाईमुळं श्री. कटके यांना शेतीमधुन मिळणारे उत्पन्न कमी  होत होतं.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागानं फेब्रुवारी 2015 ते जून 2015 दरम्यान श्री. कटके यांना  शेततळ्यासाठी 2 लाख 30 हजार रूपये मंजूर झाले. त्यापैकी 1 लाख 79 हजार रुपये अनुदान त्यांना मिळाले.  यामध्ये खोदकामासाठी 1 लाख 30 हजार तर प्लॅटिक अस्तरी करणासाठी 79 हजार रुपये देण्यात आले. या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने त्यांना मोलाचे सहकार्य केले.  श्री. कटके यांनी आपल्या शेतात शेततळं बांधलं. जलयुक्त शिवार योजनेमुळे भिवरी गावातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली.  याचा फायदा शेततळयामध्ये जलसंचय करण्यासाठी झाला.  त्यांना शेतीसाठी  पाणी उपलब्ध झालं. या पाण्याच्या जोरावर त्यांनी पावटा, वाटाणा, टोमॅटो, वाल, भाजीपाला अशी पिके घेवून जिरायती शेतीचे  बागायती शेतीमध्ये रुपांतर केले आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून त्यांनी  बागही उभी केली आहे. साहजिकच शेतउत्पादनात वाढ झाली असून आर्थिक स्तर उंचावत आहे. 'शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांना नवं जीवनच मिळालं आहे', असं श्री. कटके आवर्जून सांगतात.

महाराष्ट्रातील बहुतेक शेती ही पर्जन्यमानावर अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. श्री. कटके यांच्याप्रमाणे राज्य शासनाच्या योजनांचा लाभ अन्य शेतक-यांनी करुन घेतल्यास शेतीचे उत्पादन  वाढण्यास निश्चितच मदत होईल!  


वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा