समाजातील प्रतिभावान व्यक्तींना समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाव देणार - देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



नागपूर :   समाजातील दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच संशोधन संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रतिभावान व्यक्तींच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सामाजिक न्याय विभागाच्या प्रांगणात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी समता प्रतिष्ठानच्या समता व्हिजन व मुख्य उद्देशिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे, डॉ.मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने विविध शैक्षणिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविले असून या माध्यमातून समाजातील प्रतिभावान व्यक्तींच्या प्रतिभेला न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यातही महाराष्ट्र शासनाने समता प्रतिष्ठानची स्थापना केल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता आणण्याकरिता संविधान दिले. या माध्यमातून सामान्य माणसाला मोठी शक्ती दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या स्थापनेसोबतच प्रतिष्ठानचे प्रतिक आणि ब्रीद वाक्याचा अनावरण होत आहे. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील प्रतिभेला न्याय देण्यात येईल, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलित करुन समता प्रतिष्ठानचे विधिवत उद्घाटन केले.


सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येईल.  तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याण व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा