राज्यातील मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबरपासून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
       
मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या म्हणजेच जन्मतारीख १ जानेवारी २००० किंवा त्यापूर्वीची आहे आणि सामान्य रहिवाशी आहे अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र आहे. 

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. ३ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधित भाग, सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम दि. ७ ऑक्टोबर आणि दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी केले जाईल. रविवार दि. ८ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. ५ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यवतीकरण आदी दि. २० डिसेंबर २०१७ पर्यंत केले जाईल आणि दिनांक ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

दिनांक‍ ३ ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करायच्या असतील अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबतचे अर्ज दिनांक ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या नोंदणी अधिकारी (इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफीसर) (इआरओ) कार्यालयात तसेच अतिरिक्त मदत केंद्र म्हणून निर्देशित केलेल्या सर्व मतदान केंद्रांवर (डेसिग्नेटेड पोलींग स्टेशन्स) स्वीकारण्यात येणार आहेत.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये विहीत केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करुन पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी अतिरिक्त मदत केंद्रांवर (डेसिग्नेटेड पोलींग स्टेशन्स) तसेच जिल्हा‍ निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

मतदारांच्या  सोयीसाठी रविवार दिनांक ८ व २२ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट) (बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर) (बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.  ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./29-9-2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा