शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी २८ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने मुंबई व कोकण पदवीधर मतदार संघ आणि मुंबई व नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार दि. 28 सप्टेंबर 2017 ते 6 नोव्हेंबर 2017 या कालावधीत या मतदार संघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

या चारही मतदार संघांसाठी पूर्णत: नव्याने (डी-नोव्हो) पद्धतीने यादी तयार करण्यात येणार असल्यामुळे पूर्वीची यादी रद्द ठरणार आहे.

मुंबई व कोकण विभागातील पदवीधर व मुंबई विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 28 सप्टेंबर 2017, या अधिनियमाच्या कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची पुनर्प्रसिद्धी- 13 ऑक्टोबर, कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी- 25 ऑक्टोबर 2017, नमुना 19, नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- दि. 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची छपाई- 21 नोव्हेंबर 2017, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2017, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दिनांक 15 जानेवारी 2018 आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./29-9-2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा