दीक्षाभूमी विकास आराखडा लवकरच कार्यान्वित - देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनागपूर : दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथे आज ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या प्रगतीचा पाया रचण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेब हे व्यक्ती नाही तर संस्था होते. बाबासाहेब राष्ट्रनिर्माते युगपुरुष असून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वांना समान संधी प्राप्त झाली आहे. बाबासाहेबांचे स्मारक असलेल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला आहे. दीक्षाभूमीसमोरील जागेचा या आराखड्यात अंतर्भाव आहे. हा आराखडा लवकरच कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शस्त्रांशिवाय जगाला जिंकणारा एकमेव बौद्ध धर्म असून जगात सर्वात प्रगत राष्ट्र असलेला जपान बौद्ध धर्माच्या विचारावर जातो. आपल्या जीवनावर भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रभाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दीक्षाभूमी नेहमी ऊर्जा देत असून याठिकाणी बाबासाहेबांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेब हे विज्ञानवादी होते. जे समाजासाठी उत्तम आहे, तेच त्यांनी स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बौद्धस्थळांची शंभर कोटींची पर्यटन विकास योजना तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वंचितांचा विकास हेच सरकारचे ध्येय असून आपले सरकार बाबासाहेबांच्या विचारावरच मार्गक्रमण करेल असे ते म्हणाले.

समता, समानता व न्याय हे बाबासाहेबांचे तत्व असून या तत्वानुसारच देशाची प्रगती होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने नदी जोड प्रकल्प ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. नदी जोड प्रकल्पाची प्रेरणा बाबासाहेबांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गोष्टी आज आम्ही करत आहोत, जी प्रगती आज होत आहे त्या सर्व बाबी बाबासाहेबांनी त्याकाळी नमूद केल्या होत्या, असे ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार मनामनात रुजविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेब यांचे ‘व्हिजन’ प्रेरणादायी होते. आणि त्यानुसारच देश प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताला मजबूत करण्याचा विचार बाबासाहेबांनी दिला, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पाली भाषेचा समावेश भारतीय भाषेत व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


दीक्षाभूमीवरील या कार्यक्रमास  बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

समाजातील प्रतिभावान व्यक्तींना समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाव देणार - देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनागपूर :   समाजातील दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच संशोधन संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रतिभावान व्यक्तींच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सामाजिक न्याय विभागाच्या प्रांगणात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी समता प्रतिष्ठानच्या समता व्हिजन व मुख्य उद्देशिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे, डॉ.मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने विविध शैक्षणिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविले असून या माध्यमातून समाजातील प्रतिभावान व्यक्तींच्या प्रतिभेला न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यातही महाराष्ट्र शासनाने समता प्रतिष्ठानची स्थापना केल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता आणण्याकरिता संविधान दिले. या माध्यमातून सामान्य माणसाला मोठी शक्ती दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या स्थापनेसोबतच प्रतिष्ठानचे प्रतिक आणि ब्रीद वाक्याचा अनावरण होत आहे. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील प्रतिभेला न्याय देण्यात येईल, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलित करुन समता प्रतिष्ठानचे विधिवत उद्घाटन केले.


सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येईल.  तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याण व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

असुरी शक्तींवर विजय मिळवून चांगला समाज घडवूया – मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नागपूर : प्रभू श्रीरामांनी समाजातील सर्व घटकांना संघटित करून विजयाचा मंत्र दिला. आजही समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच असुरी शक्तींवर विजय मिळवून चांगला समाज घडवूया, असे आवाहन करत नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

जयताळा येथील बाजार मैदानात झुंझार नागरिक मंचच्या वतीने आयोजित (प्रदूषण व पर्यावरण विरूद्ध झुंज) रावण दहन उत्सव-२०१७ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'संकल्प से सिद्धी तक'च्या यशस्वितेसाठी राज्याला भ्रष्टाचार, गरिबी, जातियता आणि धर्मांधता मुक्त करुयात. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्या-छोट्या घटकांना एकत्र करुन, सज्जन समाजाच्या निर्मितीचा संदेश आपल्या कर्तृत्वातून दिला. प्रभू श्रीरामांचा हाच संदेश आपण आत्मसात करुन चांगल्या  समाजाच्या निर्मितीसाठी काम करुया.

झुंझार नागरिक मंच मागील १४ वर्षांपासून कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजक ॲड. नितीन तेलगोटे, अध्यक्ष किशोर वानखडे व संपूर्ण मंचचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला झुंझार नागरिक मंचचे कार्यकर्ते नानाजी सातपुते यांनी २१ हजार रुपये तर दत्तूभाऊ वानखेडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.


यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी प्रास्ताविकात स्वच्छ, सुंदर आणि प्रगतीशील नागपूरसाठी प्रयत्न करण्याचे नागरिकांना आवाहन केले. तसेच उपस्थित नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या                                                                    

मेट्रो रेल्वे प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन - देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे जलद दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे २० हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मेट्रो रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा व सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर माझी मेट्रोला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहराचे चित्र बदलणारा महत्वाकांक्षी प्रकल्प असून केवळ २७ महिन्यात साडेपाच किलोमीटरच्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाकार्ड सेवेचा शुभारंभही यावेळी झाला. मिहान प्रकल्प परिसराच्या मिहान डेपो येथे नागपूर मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती अरुंधती भट्टाचार्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदाताई जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, सुधीर पारवे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय सचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.

सर्वांच्या स्वप्नातील माझी मेट्रो वेगाने आकार घेत आहे. या वेगाने देशातल्या कोणत्याही मेट्रोचे काम पुढे गेले नसल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच नागपूर मेट्रो बुटीबोरी, हिंगणाकन्हानपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेट्रो स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे रस्त्यावरील ताणही कमी होईल. मॉरेस कॉलेज टी पाइंट तसेच पुणे येथील स्वारगेट येथे मोठा हब महामेट्रोतर्फे उभारण्यात येणार असून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


एसबीआयच्या महाकार्डद्वारे सर्व सेवांचा लाभ
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मेट्रो रेल्वेसाठी महाकार्डचा शुभारंभ होत असून या कार्डाद्वारे रेल्वेसह सर्व सुविधांसाठी कार्डचा वापर होणार आहे. त्यामुळे महामोबिलिटी कार्ड राज्यातील सर्व मेट्रो, बस, टोल नाके, महानगरपालिका आदी साठी एकत्रितपणे  लागू करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्टेट बँकेने मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वीच महाकार्ड लाँच केले आहे. पोर्टतर्फे वाहतूक मार्गदर्शनासंबंधात ॲप तयार करण्यात आले असून तीनशे मीटर परिसरात जीपीएस सिस्टीमद्वारे वाहतुकीच्या मार्गासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागपूरसह राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.


समृद्धी महामार्गासाठी कोरियाचे सहकार्य
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी कोरिया येथे झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महत्वाकांक्षी  मार्गासाठी  निधी  उपलब्ध करुन देण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा अकरा हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून या महामार्गासाठी निधीचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत.

चांगी विमानतळाप्रमाणेच नागपूर व पुण्याचा विकास
नागपूर विमानतळावर कार्गो हब सुविधा उपलब्ध होण्यासोबतच पुणे विमानतळाच्या विकासासाठी जगातील सर्वोत्कृष्ट चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविणाऱ्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन रस्ते आणि रेल्वेचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. यासाठी निती आयोगाने मान्यता दिली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अजनी येथे मल्टीमॉडेल हब
नागपूर मेट्रो या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे होत असून सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मेट्रो प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने महा कार्ड मेट्रो सुरु होण्यापूर्वी सुरु केले आहे. हे कार्ड सर्वत्र वापरता येणार असून या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरणार आहे. अजनी येथे मल्टी मॉडेल हब बांधण्यात येणार असून त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यासाठी सेंट्रल जेल, सिंचन विभागाच्या कॉलनीची जागा तसेच वेअर हाऊसच्या सुमारे ७००-८०० एकर परिसरावर जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र राहणार आहे.खापरी येथे कार्गो हब बांधण्यात येणार असून यासाठी केंद्र शासनाने वाराणसी व नागपूर येथे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम येत्या दोन महिन्यात सुरु होणार असून विमानांसाठी इंधन भरण्याचे सुविधा उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कार्गो हबमुळे येत्या पाच वर्षात ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.


दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. २९ : भारतीय संस्कृतीत सर्वात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, शारदीय नवरात्रोत्सवाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्ती आणि भक्तीच्या उपासनेसह त्यांच्या संवर्धनाची शिकवण देणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पावनपर्वात विविध समाजहितैषी उपक्रमांचा जागर होत असतो. या पर्वाचा समारोप करणाऱ्या विजयादशमीनिमित्त समाजातील विविध अनिष्ट प्रथांना तिलांजली देऊन नव्या विधायकतेचा स्वीकार करण्याचा संकल्प करावा.

पुणे, नागपूर विमानतळासह महानगर क्षेत्रासाठी सिंगापूरच्या सहकार्याने संयुक्त कृतीगट स्थापन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुख्यमंत्र्यांची सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबतची चर्चा फलदायी
  


मुंबई, दि. २९ : राज्यातील पुणे व नागपूर विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट कंपनीबरोबरचे सहकार्य वाढविणे आणि पुणे-नागपूर महानगर क्षेत्राच्या नियोजन व विकासासाठी सुर्बाना ज्युराँग कंपनीचे सहकार्य घेणे या दोन प्रमुख उद्देशांसाठी सिंगापूरच्या सहकार्याने संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली हेसन लोंग यांच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरली असून मुख्यमंत्र्यांसह सिंगापूरचे उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांच्या अध्यक्षतेत संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात येणार आहे.

सिंगापूरच्या दौऱ्याचा अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रात राबविले जात असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, मोठ्या प्रमाणात होत असलेली गुंतवणूक आणि विविध क्षेत्रातील गतिमान प्रगती याविषयीची माहिती पंतप्रधान लोंग यांना दिली. श्री. लोंग आगामी वर्षारंभी भारतभेटीवर येत आहेत. त्यावेळी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.


उपपंतप्रधान थर्मन षन्मुगरत्नम् यांची भेट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षन्मुगरत्नम् यांचीही आज भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी श्री. षन्मुगरत्नम् यांना विमानतळ विकासाच्या क्षेत्रात सिंगापूरचे अधिक सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. राज्यातील अन्य पायाभूत सुविधेच्या प्रकल्पांमध्येही सिंगापूरचे अधिकाधिक सहकार्य मिळविण्याबाबत यावेळी त्यांच्याशी चर्चा केली.

विमानतळ विकासासाठी सामंजस्य करार
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी सिंगापूरचे व्यापार आणि उद्योगमंत्री श्री एस. ईश्वरन यांची भेट घेतली. सिंगापूर आणि महाराष्ट्र यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत करण्याविषयी त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पोर्टआधारित विकास, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि विमानतळ विकास यांचा समावेश आहे. पुणे आणि नागपूर महानगरांमधील गुंतवणुकीच्या प्रस्तावांना गती देण्यासंदर्भात एक संयुक्त कृतीगट स्थापन करण्यासंदर्भात उद्योगमंत्री ईश्वरन यांनी सहमती दर्शविली.
त्याचप्रमाणे यावेळी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल लिमिटेड आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यात विमानतळ विकासासाठी अधिक सहकार्य करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार नियोजन, व्यावसायिक विकास, सेवासुधार, प्रशिक्षण व ज्ञानाचे आदानप्रदान, कार्गो हाताळणी, व्यवस्थापन या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सिंगापूरमधील विविध उद्योजकांशी चर्चा करता यावी यासाठी श्री. ईश्वरन यांनी एका राऊंडटेबल बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नागरी उड्डयण, बँक, पायाभूत सुविधा, नगरविकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांनी मोकळेपणाने संवाद साधला.

स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत अभियान – नवीन इतिहासाची निर्मिती (विशेष लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

आधुनिक भारताच्या इतिहासात प्रथमच देशाचे मा. प्रधानमंत्री यांनी स्वच्छता, उघड्यावरील हागणदारीपासून मुक्ती आणि वैयक्तिक स्वच्छता उपक्रमास राष्ट्रीय अभियानाचे स्वरूप दिले आहे. त्यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशवासियांना केलेले आवाहन असेल किंवा न्यूयॉर्क येथील टाइम्स स्केवअर येथून  केलेले संबोधन असेल, मा. प्रधानमंत्री यांनी एका दुर्लक्षित विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्वच्छतेसारख्या विषयावर बोलणे जेथे अप्रिय आणि घृणास्पद समजले जात होते, अशा स्वच्छतेला मा. प्रधानमंत्री यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे देशस्तरावर प्रथम प्राधान्य देऊन, एक शाश्वत चळवळ निर्माण करण्यास मोठया प्रमाणात यश मिळवता येणे शक्य झाले आहे.

महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने स्वच्छता ही सेवाया मिशनची सुरूवात दि. 15 सप्टेंबर 2017 ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधी साठी करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर सकारात्मक परिणाम होण्यासाठी या अभियानाच्या कालावधीत विविध आणि नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या अभियानाच्या काळात वर्ग 1, 2 आणि 3 अधिका-यांना जिल्ह्यातील गावे दत्तक म्हणून देण्यात आली आहेत. तसेच त्यांना या काळात किमान 5 वेळा संबंधित गावास भेट देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान त्यांनी गावात नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, कामांचे पर्यवेक्षण आणि सुरक्षित आणि योग्य स्वच्छता सुविधांच्या अवलंब करण्यासाठी समुदायास प्रेरीत  करावयाचे आहे आणि प्रोत्साहन द्यावयाचे आहे. सदर कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भेटीदरम्यान सदर अधिका-यांनी गावात किमान ३ तास थांबणे अभिप्रेत आहे. शौचालय बांधकामास व एकंदरीत स्वच्छतेच्या कामास वेग देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) ची प्रभाविता वाढविण्याच्या दृष्टीने अभियानाच्या काळात प्रत्येक दिवशी विभिन्न उपक्रमांचा समोवश करण्यात आला आहे. दि. 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता महोत्सवातून संपूर्ण राज्यातील रोज नवे उद्दिष्ट साध्य होणार आहे. या अभियानाचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे  बाजार या ग्रामपंचायतीपासून करण्यात आले आहे. आदर्श गावाचे एक उदाहरण प्रस्थापित करून याप्रमाणाचे आपले गाव देशील आदर्शवत करण्यासाठी इतर गावांना प्रेरित करणे हा यामागील उद्देश आहे. हे मिशन गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागापासून ते मुंबई सारख्या मेगा सिटीपर्यंत समांतर पध्दतीने राबविले जाणार आहे. यामुळे राज्यस्तरावर स्वच्छतेबाबत मोठी सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे.

या मिशन कालावधीत राज्यातील सर्व जिल्हयातून नियमित अहवाल प्राप्त केले जाणार असून, दररोज साध्य होणारे शौचालय बांधकाम, कमी खर्चाच्या भूमिगत गटार, उघड्यावर शौचविधी ठिकाणांची झालेली स्वच्छता रथाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी स्वच्छतेची मोठी चलचित्र व माहितीपट प्रदर्शित करणे, तसेच पथनाट्य, बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅली, सरकारी कार्यालयांची स्वच्छता अशा सर्व माध्यमातून, परस्पर संवाद आणि स्वच्छता जागृती कार्यक्रमांचे आयोजन राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे राज्यातील स्वच्छतेसंबंधी मोठी प्रगती साधण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.

महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून ओळखले गेले आहे व समाजातून आलेल्या चांगल्या सूचनांचा येथे स्वीकार करण्यात आला आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महाराष्ट्रात स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांनी स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करताना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगेळे प्रयोग करून, जनमानसाच्या मानसिकतेवर घाला टाकून स्वच्छता रूजवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते आजही प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात तिसरे, जनसंख्या, तसेच आदिवासी जनसंख्येत देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील वैविध्याचा विचार करता पर्यावरणीय, भौगोलिक विविधतेसोबतच, सांस्कृतिक, सामाजिक, विविध जाती, वैविध्यपूर्ण परिस्थिती आणि लोकांची विचारधारणा अशा सर्वच बाबी विचारात घेता राज्यात तशी असंख्य आव्हाने  आहेत. मात्र प्रत्येक आव्हाने संधीच्या स्वरूपात राज्याने स्वीकारलेली आहेत. अशी परिस्थिती असताना देखील महाराष्ट्र राज्य स्वच्छता कामात एक मैलाचा दगड ठरला आहे. 

स्वच्छ भारत अभियान हा केवळ शौचालय बांधकामाचा विषय नाही. भारताच्या इतिहासातील वर्तणूक बदलासाठी घेतलेला सर्वात मोठा पुढाकार आहे. एवढेच नव्हे देश हागणदारीमुक्त करण्यासाठी हाती घेतलेला हा सर्वात मोठा कार्यक्रम होता आणि अशा प्रकारे संपूर्ण जगभरात अशा प्रकारे कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली नाही. याचबरोबर शासनाने युनिसेफ मुंबई, टाटा ट्रस्ट, जागतिक बँक  इ. सारख्या विविध संस्थांच्या सहाय्याने माहिती शिक्षण संवादाच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली, आणि या उपक्रमांमुळे राज्यात स्वच्छता सुविधांच्या निर्मिती आणि शाश्वत वापरामध्ये एक मैलाचा दगड रोवण्यास मदत देखील झाली आहे.

सन 2012, मध्ये राज्यात स्वच्छतेची साध्य केवळ 45 टक्के होते तर सदयस्थितीत ती 87 टक्क्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. देशातील  107086  हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीपैकी 18460 ग्रामपंचायती ह्या महाराष्ट्र राज्यातील आहेत आणि ही आकडेवारी 17 टक्क्यापेक्षा जास्त आहे. सद्यस्थितीत 11 जिल्हे, 163 तालुके आणि 26943 महसूल गावे हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. माहिती शिक्षण संवाद उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सन 2016-17 या आर्थिक वर्षात राज्यात केवळ 7 लाख शौचालयाचे बांधकाम करण्यासाठीचा निधी उपलब्ध असताना साधारण 19 लाख शौचालयाचे बांधकाम करण्यात राज्यास यश प्राप्त झाले आहे. याचाच अर्थ आज राज्यात लोकांना उघड्यावरील हागणदारीचे दुष्परिणाम लक्षात आले असून या वाईट प्रथेतून मुक्त होण्यासाठी आज स्वत:हून पुढाकार घेत आहेत.

स्वच्छतेचा खरा प्रवास हा व्यक्तीपासून ते त्याचे घर, ते त्याचे अंगण ते त्याचे गाव आणि याचबरोबर राज्यात आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत असतो. सर्व शासकीय इमारती जसे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, शाळा आंगणवाडी कॉलेज, आणि खाजगी इमारती मध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण होणार नाही या बाबतची दखल घेतली पाहिजे. सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम आणि त्याच्या शाश्वत वापरासाठी निर्माण झालेल्या या सुविधांच्या देखभाल दुरूस्ती संबंधी योग्य पावले उचलावी लागतील.

स्वच्छता आणि मानवी विकासासंबंधीच्या समस्या यांच्यामध्ये एक परस्पर संबंध आहे. तोंडावाटे होणा-या संसर्गामुळे कुपोषण, त्वचा रोग, महिलांची प्रतिष्ठा, किशोर वयीन मुलींच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होणे तसेच बालमृत्यू  यासारख्या गंभीर स्वरूपाच्या परिणामांना केवळ अस्वच्छतेमुळे सामोरे जावे लागते.

राज्याची आणि परिणामी देशाची आर्थिक प्रगती मंदावण्यामध्ये स्वच्छता सुविधांच्या वापर न होणे हे प्रमुख निर्देशांक असल्याचे यातून स्पष्ट होते. LIXIL Oxford Economics India यांनी अलीकडेच केलेल्या अभ्यासातून असे लक्षात येते की सन 2015 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये 106 अब्ज अमेरीकन डॉलर्स चे नुकसान झाल्याचे दिसून आले, 5.2 टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर राहिला.

सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरोग्यपूर्ण अशा स्वच्छता सुविधांची उपलब्धता नसल्या कारणाने आज समाजात माहिलांना राज्यात दुय्यम स्थान प्राप्त होत आहे. शौचविधी साथ घरापासून दूरवर जाण्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होतो. नैसर्गिक विधी वेळेत पूर्ण न केल्यामुळे विविध संक्रमणाचे आजार उद्भवतात याचबरोबर गर्भावस्थेत धोका निर्माण होण्याची शक्यता देखील नकारता येत नाही. मासिक पाळी दरम्यान योग्य काळजी न घेतल्याने किशोर वयीन मुलींना विविध संसर्गजन्य आजारांना तोंड द्यावे लागते, तर त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होतो.

युनिसेफ मुंबई यांच्या तांत्रिक सहाय्यातून मासिक पाळी व्यवस्थापनासंबंधी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि हागणदारी मुक्ततेच्या पुढील टप्प्यावरील बंधनकारक करून राज्यातील सर्व किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देण्याबाबत आज राज्यात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा सोडण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह आणि विशेष खोलीची व्यवस्था निर्माण करण्यासंबंधी शिक्षण विभागास विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर स्वच्छता घरातील साफसफाई, सॅनीटरी पॅड ची उपलब्धता आणि पॅडच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सोयीसुविधांची उपलब्धता करण्यात येण्यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छतेची समस्या शाळेचा दैनदिन विषय बनून वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसंबंधी त्यांना प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे.

तसेच महिला आणि बाल विकास विभाग, सार्वजनीक आरोग्य विभाग, ग्रामीण विकास विभाग, आदीवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग यांच्या सहयोगामुळे स्वच्छता समस्या संबंधी एकात्मिक दृष्टिकोन निर्माण होऊन काम करण्यास एक नवी दिशा मिळाली आहे.

हागणदारीमुक्त राज्याची निर्मिती हाच केवळ आपला उद्देश नाही आहे तर स्वच्छतेच्या सर्व घटकांची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी राज्याने यापूर्वीच ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नागपूर, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे इ. जिल्ह्यांनी सांडपाणी आणि घनकचरा संसाधनाच्या व्यवस्थापनासाठी व मासिक पाळी व्यवस्थापनासाठी एकमेवाव्दितीय असा पुढाकार घेतला आहे. गावे हागणदारीमुक्त होवून हागणदारीत्तोर गावात विविध स्वच्छता कामांना मोठया प्रमाणात सुरूवात होईल या बाबत कोणतीही शंका असल्याचे कारण नाही.

स्वच्छता हा विषय व्यक्तिगत अथवा कौटुंबिक स्तरावर विचार करण्याचा विषय नाही. तर या अस्वच्छतेमुळे उघड्यावरील शौच प्रथेमुळे संपूर्ण सामाजिक हानी होते आहे या बाबत विचार होणे आवश्यक आहे. स्वच्छता हा शासकीय कार्यक्रम नसून, ती आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे आणि ती पार पडताना प्रत्येकाने निर्माण केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्याने स्वतःच करावे अशा प्रयत्नात शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.

आपण सर्वानी कचरा निर्मितीचे प्रमाण कमी करायला हवे. तीन ‘R’ म्हणजेच Reduce, Reuse, आणि Recycle हे तीन शब्द शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी आदर्शवत आहेत आणि आपण सर्वानी त्याचे अनुकरण करायला हवे.

महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की स्वत:मध्ये सुधारणा करणे हा समाज सेवेतील सर्वात महत्वाचे आणि विश्वासाचे स्वरूप आहे. आज प्रत्येकाने निर्धार करून स्वत:ला आणि सभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवला तर संपूर्ण राज्य आणि देश आपोआपच स्वच्छ बनेल. मार्च 2018 अखेर संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. राज्यात यासाठी एक लोकचळवळ निर्माण व्हावी असे मला वाटते आणि असे केल्यास महात्मा गांधी यांचे स्वच्छ आणि समृध्द देशाचे स्वप्न ख-या अर्थाने जमिनीवर उतरेल असा मला विश्वास आहे आणि राज्याचे नागरिक निश्चितच देशाचे हे ध्येय साकार करण्यात शासनाची निराशा करणार नाहीत असा मला अखंड विश्वास आहे.
०००


श्री.इर्शाद बागवान, सहायक संचालक

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी २८ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने मुंबई व कोकण पदवीधर मतदार संघ आणि मुंबई व नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार दि. 28 सप्टेंबर 2017 ते 6 नोव्हेंबर 2017 या कालावधीत या मतदार संघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

या चारही मतदार संघांसाठी पूर्णत: नव्याने (डी-नोव्हो) पद्धतीने यादी तयार करण्यात येणार असल्यामुळे पूर्वीची यादी रद्द ठरणार आहे.

मुंबई व कोकण विभागातील पदवीधर व मुंबई विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 28 सप्टेंबर 2017, या अधिनियमाच्या कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची पुनर्प्रसिद्धी- 13 ऑक्टोबर, कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी- 25 ऑक्टोबर 2017, नमुना 19, नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- दि. 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची छपाई- 21 नोव्हेंबर 2017, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2017, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दिनांक 15 जानेवारी 2018 आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./29-9-2017

राज्यातील मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम ३ ऑक्टोबरपासून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
       
मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या म्हणजेच जन्मतारीख १ जानेवारी २००० किंवा त्यापूर्वीची आहे आणि सामान्य रहिवाशी आहे अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र आहे. 

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. ३ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधित भाग, सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम दि. ७ ऑक्टोबर आणि दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी केले जाईल. रविवार दि. ८ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. ५ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यवतीकरण आदी दि. २० डिसेंबर २०१७ पर्यंत केले जाईल आणि दिनांक ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

दिनांक‍ ३ ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करायच्या असतील अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबतचे अर्ज दिनांक ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या नोंदणी अधिकारी (इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफीसर) (इआरओ) कार्यालयात तसेच अतिरिक्त मदत केंद्र म्हणून निर्देशित केलेल्या सर्व मतदान केंद्रांवर (डेसिग्नेटेड पोलींग स्टेशन्स) स्वीकारण्यात येणार आहेत.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये विहीत केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करुन पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी अतिरिक्त मदत केंद्रांवर (डेसिग्नेटेड पोलींग स्टेशन्स) तसेच जिल्हा‍ निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

मतदारांच्या  सोयीसाठी रविवार दिनांक ८ व २२ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट) (बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर) (बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.  ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./29-9-2017