ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक दृढ व्हावेत - रामराजे नाईक-निंबाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई दि. ३१  : ऑस्ट्रेलिया आणि राज्यातील औद्योगिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण  व्हावी आणि उभयतांमधील सबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी ऑस्ट्रेलियातील शिष्टमंडळाने दर महिन्याला एकदा भेट द्यावी, असे निमंत्रण सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतासाठीचे विशेष प्रवक्ता बॅरी ओ फेर्रेल यांना दिले.

राज्याचे विधिमंडळ आणि ऑस्ट्रेलियातील विधिमंडळादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत श्री. फेर्रेल हे राज्यास भेट देण्‍यासाठी आले होते. विधिमंडळातील सभापतींच्या दालनात झालेल्या औपचारिक चर्चेदरम्यान श्री. नाईक- निंबाळकर बोलत होते.

श्री. नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, राज्यातील कृषी क्षेत्रात ऑस्ट्रेलियाचे सहकार्य कशा प्रकारे  घेता येईल याबाबत शक्यता पडताळून पाहता येतील. त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठ आणि खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांच्या संलग्नतेने शिक्षण घेता यावे. छोट्या शहरातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्रशिक्षण द्यावे त्याप्रमाणे कबड्डीसारख्या खेळांचे प्रशिक्षण ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना भारतीय प्रशिक्षकांनी द्यावे.   


यावेळी ऑस्ट्रेलियातील शिष्टमंडळास महाराष्ट्र पर्यटन करण्याचे  तसेच  नागपूर  येथे  डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी  उपस्थित राहण्याचेही निमंत्रण सभापतींनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा