आधुनिक उपचारासाठी हॉस्पिटल सोबतच सेवाभाव महत्त्वाचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी मुंबई, दि.30 : आधुनिक उपचारासाठी हॉस्पिटल सोबतच सेवाभाव महत्त्वाचा आहे. कॅन्सर उपचारासाठी अत्याधूनिक उपचार केंद्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे. नवी मुंबईमधील महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या या हॉस्पिटलमधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत उपचार केले जाणार आहेत. या हॉस्पिटलमधून दररोज एका मुलाला मोफत उपचार केले जाणार आहे. ही महत्त्वाची बाब आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई सानपाडा येथे आजमहात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.प्रिन्स सुराणा यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या ह्या हॉस्पिटलमध्ये 100 बेडची सोय असून अत्याधुनिक उपचार यंत्रांणी सज्ज आहे. या 12 मजली हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या अत्याधुनिक उपचाराची सोय आहे. दरमहा तीस मुलांना मोफत उपचार या हॉस्पिटलमधून होणार आहेत. जगात उपलब्ध असणारे अत्याधुनिक यंत्रणा येथे आहे. उपचारासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.



मुख्यमंत्री म्हणाले, आधुनिक कॅन्सर हॉस्पिटल सुरु केले ही चांगली बाब आहे. सेवेचा भाव यात आहे. हजारो लोक राज्यात सेवाकार्यात आले आहेत. जैन संतांचे  तेज लोकांच्या सेवा कार्यासाठी प्रेरणा देणारे आहे. हॉस्पिटलमध्ये चांगले व आधुनिक उपचार येथे मिळतील. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि उपचारासाठी केवळ 50 टक्के रक्कम द्यावी लागेल. कॅन्सर हा आजार  गरीब, श्रीमंत पाहत नाही तो कोणालाही होतो. त्यावर उपचार महागडे आहेत. लोकांना आर्थिक व शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. म्हणून असे केंद्र अनेक ठिकाणी सुरु होणे आवश्यक आहे. येथे एक मुलाचा उपचार मोफत होणार आहे. ही खूप मोठी सेवा आहे. त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन.

मुख्यमंत्री रिलीफ फंडातून उपचारासाठी मदत केली जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 1 हजार रोगांवर मोफत उपचार केले जात आहेत. यामुळे राज्यातील कोणताही माणूस उपचाराविना राहणार नाही. राज्य शासन अशा हॉस्पिटलसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

जैन मुनी नयपदमसागर महाराज यांनी भाषणत सांगितले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईवर आलेल्या आपत्तीबाबत स्वत: लक्ष घातले. काल आपत्ती व्यवस्थापन कक्षात स्वत: जाऊन त्यांनी सर्वांची माहिती घेतली. ही खूप मोठी बाब आहे. त्यांचे सेवाकार्य मानव जातीच्या कल्याणासाठी सुरु आहे. लोक अडचणीत असताना मुंबईत सर्व धर्मियांनी मदत केली. याबद्दल त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले. हे हॉस्पिटल सेवेसाठी असावे. मुख्यमंत्री यांचे काम सेवाकार्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हॉस्पिटलचा अधिक लाभ गरिबांना मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


या कार्यक्रमास महापौर सुधाकर सोनावणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, आदी उपस्थित होते. शेवटी  डॉ.प्रिन्स सुराणा यांनी  आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा