महाराष्ट्रात लवकरच पंजाबी अकादमी सुरु करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३० : विविध भाषांमधील सांस्कृतिक आणि साहित्यिक देवाणघेवाण होण्यासाठी महाराष्ट्रात उर्दू, गुजराती आणि हिंदी अकादमी आहेत. महाराष्ट्रात विशेषत: नांदेड येथे अधिक पंजाबी लोकसंख्या आहे हे लक्षात घेऊन नांदेड येथे पंजाबी अकादमी सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी साहेब श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ‘प्रकाश पर्व’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पद्मश्री विमल सिंग खालसा, आमदार सरदार तारासिंग, अफताक शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, आज महाराष्ट्रातील नांदेड येथे शीख धर्माचे बहुसंख्य लोक राहतात. तर येथे असलेल्या गुरुद्वारा आणि शिकारघाट येथे देश विदेशातून धार्मिक लोक येत असतात हे लक्षात घेऊन नांदेड येथे ऐतिहासिक कार्यक्रमाद्वारे प्रकाशपर्वचा सांगता समारंभ आयोजित केला जाईल. तसेच प्रकाश पर्व अंतर्गत विविध ठिकाणी सध्या कार्यक्रम होत असून यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल.

आज वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने येथील सर्व वातावरण गुरु गोविंद सिंग यांच्या भक्ती आणि शक्तीने प्रभावित झालेले आहे. गुरु गोविंद सिंग हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी नेहमीच मानवतावादी दृष्टीकोन आणि देशहिताला प्राधान्य दिले होते. देशाची सेवा, संस्कृती आणि मानवता आपण सर्वांनी जपणे आवश्यक असल्याचे संस्कार त्यांनी आपल्यावर केले आणि आपला पुरुषार्थ जागा ठेवला. आज देशभरात प्रकाश पर्व साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने गुरु गोविंद सिंग यांनी आपल्याला दिलेली संस्कृती, आचार-विचार, संस्कार आपण पुढील पिढीपर्यंत नेण्याचे काम करणे आवश्यक आहे. गुरु गोविंद सिंग यांची परंपरा पुढे नेत समाजातील विषमता, दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
‘वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह’ असा नारा देणारे शीख धर्मीय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नांदेड आणि दिल्ली येथून वर्षा निवासस्थानी जमले होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा