चंद्रपूरमध्ये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केली बांबूपासून सायकल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


चंद्रपूर, दि. 31 : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. मात्र 2014 पासून सुरु झालेल्या या केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविधांगी वस्तुंनी लक्ष वेधणे सुरु केले आहे. इतर लक्षवेधी शोभेंच्या वस्तूसोबतच प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेली बांबूची पर्यावरणपूरक सायकल चर्चेत आली असून ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे.

राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रिम प्रोजेक्ट समजल्या जाणा-या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अवघ्या दोन वर्षात या ठिकाणच्या अभिनव प्रशिक्षणातून महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थ्यांना आगरतला (त्रिपूरा) येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी घरातील शोभेच्या, रोजच्या गरजेच्या वस्तुंसोबतच आता तंत्रज्ञानाची जोड देत अभिनव प्रयोग सुरु केले आहे. गेल्या दोन वर्षात 194 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांनी परिश्रमपूर्वक साकारलेल्या वस्तूंना जनतेपर्यंत नेण्यासाठी या केंद्राचे संचालक राहुल पाटील (भावसे) प्रयत्नशील आहे. यामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेला राष्ट्रध्वज, ढाल तलवार, स्मृतीचिन्ह, कंदील (लाल-टेन), टेबल लॅम्प, स्टडी टेबल, पोडीयम आदी वस्तुंचा समावेश होता. याशिवाय डायनिंग टेबल, सोफासेट, पलंग आदी आवश्यक वस्तूंनीही लक्ष वेधले. मात्र बांबूपासून तयार झालेली सायकल नवीन उपक्रम म्हणून लक्षवेधी ठरली.


कशी आहे सायकल
बांबूपासून तयार केलेल्या सायकलीमध्ये जवळपास 70 ते 80 टक्के वापर बांबूचा केला आहे. केवळ सायकलची चाके व तांत्रिक जोडणीच लोखंडी आहे. दीड महिन्याच्या अथक परिश्रमातून संचालक राहुल पाटील यांच्या कल्पनेतील ही सायकल या संस्थेचे प्रशिक्षणार्थी किशोर मुरलीधर गायकवाड, अमोल झित्रुजी कोटनाके, शिवा नागा प्रसाद यांनी उभी केली आहे. बांबूची तणावक्षम शक्ती अधिक असते. तसेच बांबूच्या आतील लिग्नीनमुळे कंपनशोषणाला मदत होते. त्यामुळे थेट लोखंडापासून तयार होणा-या सायकलीपेक्षा ही सायकल अधिक आरामदायी ठरते. लोखंडी सायकलीच्या तुलनेत ही सायकल हलकी असून दिसायला अधिक सुंदर आहे. या प्रशिक्षणार्थ्यांनी आणखी काही सायकलींचे मॉडेल तयार करण्याचे ठरविले आहे. या सायकलीच्या आवश्यक चाचणी आणि मान्यतेनंतर एका जाहिर कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सायकलचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी श्री. पाटील यांनी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंबद्दल व उपक्रमांबाबत माहिती दिली. संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संलग्नतेने दोन वर्षाचा डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील बांबूपासून तयार झालेली बहुदा पहिली सायकल असावी असा मनोदय प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी देखील माध्यम प्रतिनिधीशी या ठिकाणच्या प्रशिक्षणातून झालेल्या कौशल्य विकासाबाबत समाधान व्यक्त केले.


महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टि.एस.के.रेड्डी, चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांचे कल्पक नेतृत्व प्रगतीपथावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा