‘भीम ॲप’ व ‘भीम आधार ॲप’च्या माध्यमातून अर्थशास्त्री डॉ. आंबेडकर यांना मानवंदना - मुख्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम अर्थशास्त्री होते. त्यांनी समतेच्या तत्वावर संविधानाची निर्मिती केली. 20 व्या शतकातील चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र होते. आता 21 व्या शतकातील डिजिटल चलनावर ‘भीम ॲप’ व ‘भीम आधार ॲप’ला राष्ट्रनिर्माते असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असून ही डॉ. आंबेडकर यांना मोठी मानवंदना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

अनुसुचित जाती/जमाती/विजा-भजा/इमाव/विमाप्र शासकीय /निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आयकर विभागाचे आयुक्त सुबचन राम, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकविले. स्वराज्याच्या स्थापनेसाठी सामान्य लोकांना एकत्रित करुन त्यांच्यात पौरुष जागृत करून मोठी सेना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली. आमचा राजा समाजासाठी लढत असल्याची भावना त्यांच्या सैन्यात असल्यामुळे मोठमोठ्या सैन्याबरोबर त्यांनी लढाई केली.

समाजात विषमता तयार झाली. त्यावेळी मानव मानवाला कमी लेखत होता. या विषमतेत जगत असतानाच प्रचंड संघर्ष करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समतेचे, न्यायाचे, संविधान दिले. डॉ. आंबेडकर यांचे इतिहासात बहुमोल कार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम विधीज्ञ तसेच उत्तम अर्थशास्त्री होते. त्यांनी त्या काळात अर्थशास्त्रावर केलेले संशोधन अजूनही जगात अत्यंत मोलाचे मानले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भीम ॲप आणि भीम आधार ॲप तयार केले. महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केले कार्य, शेतकऱ्यांबद्दलचे त्यांचे हे मोलाचे आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. तर काही मागण्यांसंदर्भात बैठक घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. पाच दिवसाच्या आठवड्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर योग्य निर्णय घेऊ. मंत्रालयातील प्रवेशद्वारांना राष्ट्र पुरुषांचे नाव देण्यासंदर्भातील संघटनेच्या मागणीवर व्यवहार्य असून त्यासाठी राज्यव्यापी धोरण ठरवून निर्णय घेण्यात येईल.



केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, मंत्रालयात महापुरुषांची जयंती साजरी होत असल्याने आनंद वाटला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार व राज्य घटनेतील देश निर्माण करण्याचे काम होत आहे. दलित समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, या समाजातील तरुण अधिकारी होत आहेत, असे सकारात्मक बदल होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्ण व्यवस्था व विषमतेविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी समतेचा विचार मांडला. डॉ. आंबेडकर यांनी सर्व नागरिकांना सोबत घेऊून सर्वधर्म समभावाचे राज्य निर्माण करण्यासाठी संविधान लिहिले.

केंद्र व राज्य शासनाने इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारकासाठी 3600 कोटीची जमीन दिली. तसेच स्मारकासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. तसेच लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घराची खरेदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीत उभी राहत असलेली भव्य इमारत, भीम ॲप व भीम आधार ॲप आदी महत्त्वपूर्ण उपक्रम शासनाने हाती घेतले आहेत. डॉ. आंबेडकर यांचे महत्त्व या शासनाला माहिती असून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम हे शासन करत आहे.

सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले म्हणाले की, आज जग छोटे होत असून ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. तरीही समाजात अजूनही जुन्या रुढी वाढत आहेत. तसेच आर्थिक विषमताही वाढत आहे. सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरणार आहेत. विषमता दूर करण्यासाठी  महापुरुषांचे तत्वज्ञान मनामनात रुजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्री. राम यांचे व्याख्यानही झाले.
०००

नंदकुमार वाघमारे/डीएलओ/29.4.2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा