कुलाबा, कफ परेड भागाचा सर्वांगीण विकास करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : मुंबईतील कुलाबा, कफ परेड या भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास केला जाईल. या भागातील लोकप्रतिनिधी, जनता, एनजीओ आदी सर्वांनी विकासाच्या या प्रक्रियेत सहभाग घेऊन आपला प्रभाग हा फक्त मुंबईतच नव्हे तर देशात आदर्श ठरु शकेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

या भागातील नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर व श्रीमती हर्षिता नार्वेकर यांचा आज विविध रेसीडेन्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, आमदार राज पुरोहित, आमदार राहुल नार्वेकर यांच्यासह विविध रेसीडेन्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक आर्थिक संस्था या भागात असून हा भाग खऱ्या अर्थाने देशाचे फायनान्शियल हब आहे. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आमदार, नगरसेवक यांनी लोकांच्या सहभागातून या भागाचा विकास आराखडा तयार करावा. त्याप्रमाणे विकास करण्यासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल, असे ते म्हणाले.

मुंबईतील उपनगरीय रेल्वेवरील ताण पाहता तो कमी करण्याच्या आणि लोकांचा प्रवास सुसह्य करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मेट्रो रेल्वे, एलिव्हेटेड रेल्वे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर लिंक यांसारखे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक ही सुसह्य करण्यात येईल. किंबहूना मुंबईतील सार्वजनिक वाहतूकीच्या साधनांचा वापर हा सधन वर्गाकडूनही केला जाईल, अशा आदर्श पद्धतीची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.लोकांकडून लोकप्रतिनिधींचा होणारा गौरव हा नेहमीच स्फूर्तीदायक असतो. विविध रेसीडेन्ट असोसिएशनमार्फत झालेला नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर व श्रीमती हर्षिता नार्वेकर यांचा सत्कार हा आगळा-वेगळा असून त्यांनी हा लोकसहभाग कायम ठेवत आपल्या प्रभागांचा कायापालट करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. प्रभू यावेळी म्हणाले की, मुंबईत रेल्वे विकासासाठी शासनाने साधारण 56 हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. केंद्र आणि राज्य शासन मुंबईच्या विकासासाठी अत्यंत सकारात्मक उपाययोजनांची आखणी करुन त्याची अंमलबजावणी करीत आहेत. मुंबईकरांचा रोजचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहतुकीचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा