अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयाची जागा एक महिन्यात निश्चित करावी - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 :  अकोल पशुवैद्यकीय महाविद्यालयाची जागा एक महिन्यात निश्चित करून त्याच्या विकास आराखड्यासह प्रस्ताव शासनास पाठवावा, असे आदेश आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

आज विधानभवनात यासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय धोत्रे,  आमदार रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू ए.के. मिश्रा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

विदर्भातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन नाशिक विभागात जळगाव येथे, तर अमरावती विभागात अकोला येथे प्रत्येकी एक याप्रमाणे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात घोषित केला होता. त्यानुषंगाने आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की अकोल्याचे पशुवैद्यकीय महाविद्यालय हे जगात सर्वोत्कृष्ट महाविद्यालय होईल याची काळजी घेऊन या महाविद्यालयाचे काम कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यात यावे. यासाठी  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला जावा तसेच यासंबंधी ज्या देशांमध्ये चांगले काम झाले आहे, त्याचीही माहिती घेतली जावी.


पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिवांनी व्यक्तिश: या कामावर देखरेख ठेऊन अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने पुर्णत्वाला जाईल याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा