शासन श्री. भुसारे यांना मदत करणार, मुख्यमंत्र्यांच्या वतीने डॉ. रणजित पाटील यांचे निवेदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 : औैरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शेडनेट व पॉलीहाऊसचे गारपीटीमुळे नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी याबाबतची भरपाई मिळण्यासाठी कृषी विभाग तसेच बँकेकडे प्रयत्न केले होते. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना मदत प्राप्त होऊ शकली नाही. तसेच बँकेकडे भरण्यासाठी त्यांच्याकडे २५ टक्के रक्कम नसल्यामुळे त्यांना कर्जही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे  त्यांना आलेले नैराश्य दूर करणे आवश्यक असल्याची शासनाची भावना आहे. त्यामुळे त्यांचे शेडनेट व पॅालिहाऊसचे नुकसान भरून काढून त्यांना पुनःश्च योग्य प्रकारे शेती व्यवसाय करता यावा, यासाठी बँकेकडे प्रलंबित असलेल्या त्यांच्या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते मार्गी लावण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. तसेच त्यामध्ये काही अडचण आल्यास श्री. भुसारे यांना शासनाकडून यथायोग्य मदत करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने गृह राज्यमंत्री (शहरे) डॅा. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.

श्री. रामेश्वर भुसारे यांच्या संदर्भात २३ मार्च रोजी मंत्रालयात घडलेल्या घटनेसंदर्भात सभागृहात मविप नियम २८९ अन्वये उपस्थित सूचनांच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने हे निवेदन करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे २३ मार्च २०१७ रोजी दुपारच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आले होते. दिनांक ११ व १२ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या गारपिटीत त्यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शेडनेट व पॅालिहाऊसच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी त्यांनी स्थानिक कृषी विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, नैसर्गिक आपत्तीत दिली जाणारी मदत ही फक्त पिकांसाठी दिली जाते, असे त्यांना कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पुढच्या वर्षासाठी या शेतक-याला शासकीय योजनेतून नेटशेडसाठी अर्ज करण्यात सांगितले. त्यानुसार डिसेंबर २०१६ मध्ये त्यांची निवड होऊन वर्क ऑर्डरही देण्यात आली. मात्र, आर्थिक अडचणीचे कारण देत त्यांनी या संधीचा लाभ घेतला नाही. त्यांना बँकेतून कर्ज उपलब्ध व्हावे यासाठीही कृषी विभागाच्या अधिका-यांनी मदत केली. बँकेने २५ टक्के रक्कम भरण्यास सांगितल्याने व त्यांनी सदर रक्कम बँकेकडे अद्याप भरणा केली नसल्याने सद्य:स्थितीत त्यांचे प्रकरण बँकेकडे प्रलंबित आहे. एकंदरित श्री. भुसारे यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे.

दि. २३ मार्च २०१७ रोजीच्या मंत्रालयातील घटनेत श्री भुसारे यांनी माध्यमांना पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. श्री. भुसारे यांना पोलिसांनी मारहाण केलेली नाही. श्री. भुसारे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आक्रमक झाले होते. त्यांना लिफ्टमधून खाली घेऊन येत असताना ते शिवीगाळ करत होते व लाथाबुक्क्या  मारत होते. त्यांना  मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे  आणत असताना त्यांनी पोलीस मोबाईल वाहनातील वाहतूक नियमनाकरीता वापरण्यात येणा-या नायलॅानच्या रस्सीने स्वतःचा गळा आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस हवालदार श्री. पाटणकर यांनी त्यांना अटकाव केला असता श्री. पाटणकर यांच्या हाताला चावा घेतला. त्यावेळी श्री. पाटणकर यांनी स्वतःच्या हाताला झटका दिला असता त्यांचा हात श्री. भुसारे यांच्या तोंडाला लागला. त्यामळे श्री. भुसारे यांच्या ओठाला दुखापत झाली. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना तत्काळ जीटी हॉस्पिटल येथे औषधोपचार येथे पाठविले. श्री. पाटणकर यांच्या तक्रारीवरून श्री. भुसारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येऊन अटक करण्यात आली. त्यांचे कुटुंबिय येताच त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, किल्ला कोर्ट यांचे समक्ष सादर केले असता त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली आहे. श्री.  भुसारे यांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे मारहाण करण्यात आली नाही. श्री. भुसारे यांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्यानुषंगाने सखोल चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्त, कुलाबा विभाग, मुंबई करीत असल्याचे  मुख्यमंत्र्यांच्या वतीने श्री. पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा