निर्वासितांच्या वसाहतींचा सर्वेक्षण अहवाल एका महिन्यात सादर करावा - प्रकाश महेता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 : फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी ज्या वसाहती उभारण्यात आल्या होत्या, त्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. या वसाहतींचा पुनर्विकास करावायाचा असून, एक महिन्याच्या आत या वसाहतींच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिले आहेत.

मुंबई शहर व उपनगरातील वसाहती अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. या समस्येकडे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांनी लक्ष वेधले होते व गृहनिर्माण मंत्री आणि महसूल मंत्र्यांनी या वसाहतींचा पुनर्विकास करावा, यासाठी मागणी केली. या समस्येसंदर्भात गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. महेता बोलत होते. या बैठकीत गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे, महसूल विभागाचे उपसचिव श्यामसुंदर पाटील, मुंबई मंडळ म्हाडाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे, नगरविकास विभागाचे अवर सचिव श्री. गिरोला आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.महेता यांनी मुंबई शहर-उपनगर समवेत सर्व वसाहतींची माहिती घेतली. या वसाहतींचा पुनर्विकास बीडीडी चाळींच्या धर्तीवर करावयाचा असेल तर महसूल विभागाने हा पुनर्विकास कशा पध्दतीने करता येईल, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या परवानग्या घेणे आवश्यक आहे, याबाबत अहवाल सादर करावा. या अहवालानंतर गृहनिर्माण विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.


श्री.महेता यांनी सांगितले की, नगरविकास विभागाच्या विकास नियंत्रण नियमावलीत थोड्याफार बदलासह हा पुनर्विकास होणे शक्य आहे. म्हणून सर्व विभागांनी एकत्रितरीत्या सकारात्मक पध्दतीने या निर्वासितांच्या वसाहतींचा पुनर्विकासाच्या दृष्टीने तातडीने कार्यवाहीस सुरुवात करावी, असेही श्री. महेता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा