नवनियुक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी पदभार स्वीकारला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 28 : सुमारे 20 वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आज त्या कार्यालयात सुमित मल्लिक यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना पदाची सूत्रे सुपूर्द केली. भारतीय प्रशासन सेवेतील 1982 च्या तुकडीचे अधिकारी असलेले श्री. मल्लिक हे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. मुख्य सचिवांच्या दालनात आज सायंकाळी श्री. मलिक यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरूवात केली. यावेळी श्री. क्षत्रिय यांनी श्री. मल्लिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्य सचिव मल्लिक यांचा अल्प परिचय –
13 मार्च 1958 रोजी  जन्मलेले श्री. मल्लिक हे मूळचे कोलकाता येथील आहेत. उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले श्री. मल्लिक हे संवेदनशील लेखक, कादंबरीकार म्हणून  सुपरिचित आहेत. लेखनाचा छंद असलेले श्री. मल्लिक यांनी इतिहास या विषयामधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर जगप्रसिद्ध वेल्स विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि विकासात्मक अभ्यास या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. बंगलुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीएची पदवीही संपादन केली.

1982 मध्ये ते भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. 1983 मध्ये नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली, अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर, महाराष्ट्र हातमाग मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, त्यानंतर 1987 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली. 1989 मध्ये मुंबई येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी (यूएलसी) म्हणून त्यांनी काम पाहिले.

1991 मध्ये त्यांची सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1994 मध्ये महसूल व वन विभागात उप सचिव (भूकंप मदत) म्हणून नियुक्ती झाली. 1996 मध्ये मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 1998 मध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले.  त्यानंतर त्यांची अमरावती विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2002 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 2003 मध्ये राज्यपालांचे सचिव, 2005 मध्ये महाराष्ट्र चित्रपट, नाटक, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) व्यवस्थापकीय संचालक, 2009 मध्ये सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असताना त्यांच्या कडे विशेष चौकशी अधिकारी, परिवहन आणि उत्पादन शुल्क या पदांचा अतिरिक्त कार्यभार होता. 2011 मध्ये काही काळ त्यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदाचा कार्यभार होता. 2011 मध्ये राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. 2013 मध्ये त्यांना अपर मुख्य सचिवपदी बढती देण्यात आली. मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदाबरोबर त्यांनी या काळात राज्य उत्पादन शुल्क व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले.
००००

अजय जाधव, 28.2.2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा