आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काच्या बाजारपेठेसाठी ‘वारली आदिवासी हाट’ - विष्णू सवरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीची ओळख करुन देण्यासाठी तसेच आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मनोर येथे वारली आदिवासी हाट उभारण्यात येत आहे, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री महोदयांच्या दालनात वारली आदिवासी हाट संदर्भात आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्बात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी आमदार पास्कल धनारे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा वर्मा, पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित भांगर, पोलिस अधिक्षक शारदा राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.


श्री. सवरा म्हणाले की, आदिवासी बांधवांच्या कला संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच त्यांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. यामध्ये राज्यातील, देशातील आदिवासी व पारंपरिक कलांचे जतन संवर्धन व त्यांनी बनविलेल्या कलाकृतींची विक्री होईल, असे सांगून श्री. सवरा म्हणाले की, विविध भागातील आदिवासींची जीवनपध्दती तसेच त्यांचे पारंपरिक उत्सव हस्तकलेच्या वस्तू, चित्रे यांचे दर्शनही याठिकाणी होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा