पेप्सिको कंपनी नांदेडमध्ये फळ प्रक्रिया प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी यांच्यात चर्चा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विकास विभाग व पेप्सिकोमध्ये सामंजस्य करार
तीन आयटीआयचे आधुनिकीकरणासाठी कंपनीचे राज्य शासनास सहकार्य
व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये पेप्सिको सहभागी होणार


मुंबईदि. 28 शीतपेये क्षेत्रातील अग्रगणी पेप्सिको कंपनी महाराष्ट्र शासनाबरोबर सहकार्य करून कृषी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असून कंपनी नांदेडमध्ये सुमारे १८० कोटी रुपये गुंतवणूक करुन फळ प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांच्या चर्चा झाली. यावेळी खेड्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनचे श्रीमती नुयी यांनी कौतुक करून त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. तसेच यावेळी कुशल मनुष्यबळ विकासासाठी महाराष्ट्र शासन व पेप्सिको कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

पेप्सिको कंपनी महाराष्ट्रात नांदेडमध्ये फळ प्रक्रिया प्रकल्प उभारणार असून यासंबंधीची चर्चा आज झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाकडून या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन श्रीमती नुयी यांना दिले. यावेळी पेप्सिकोच्या आशियामध्यपूर्व व उत्तर आफ्रिका विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चड्डापेप्सिको इंडियाचे चेअरमन शिव कुमारश्री. संजीवमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी,कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. विजय कुमारकौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूरमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस यांनी पेप्सिको कंपनीच्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करून या प्रकल्पासाठी राज्य शासन मदत करणार असल्याचे सांगितले. राज्यातील दोन हजार खेड्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या  व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन व त्यासाठी स्थापण्यात आलेल्या फाऊंडेशनची माहिती श्री. फडणवीस यांनी श्रीमती नुयी यांना दिली. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून यामध्ये पेप्सिको कंपनी सहभाग घेण्यास उत्सुक असल्याचे श्रीमती नुयी यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रात विविध उपक्रमाद्‌वारे कृषी क्षेत्रात बदल करण्यात येत आहेत. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांच्या वाढीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष धोरण आखण्यात येत असल्याचे सांगितले.  

तसेच राज्यातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत असून उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ मिळावेयासाठी उद्योगांच्या सहकार्याने अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

श्रीमती नुयी म्हणाल्या कीमहाराष्ट्र राज्य हे अतिशय महत्त्वाचे राज्य असून येथे सुमारे १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस आहे. यामाध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून त्यासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी राज्य शासनास सर्वतोपरी मदत करण्यास कंपनी तयार आहे. राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठीही कंपनी मदत करणार असून त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात शीतपेयासाठी लागणाऱ्या लिंबूवर्गीय फळांचे क्लस्टर तयार करणार आहे.

खेड्यांच्या सर्वांगीण विकासाचा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण असून यासाठी राज्य शासनास पेप्सिकोतर्फे सर्व सहकार्य दिले जाईलअसेही श्रीमती नुयी यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभाग व पेप्सिको कंपनीमध्ये सामंजस्य करार

राज्यात कृषी क्षेत्रात तसेच अन्न प्रक्रिया क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास विभाग व पेप्सिको कंपनीमध्ये यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. कपूर व पेप्सिको इंडियाचे चेअरमन श्री. शिव कुमार यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

या करारानुसारराज्यातील तरुणांना पेप्सिको कंपनीमार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना नोकरीही मिळणार आहे. तसेच पेप्सिकोचे रिटेल क्षेत्रात मोठे जाळे आहे. याचा फायदा राज्यातील तरुणांना मिळावायासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने कंपनीमार्फत तरुणांना यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षित तरुणांना या नेटवर्कमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) आधुनिकीकरण पेप्सिकोच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. तसेच विविध अन्न प्रक्रिया उद्योगांना लागणारे कुशल कामगार निर्मितीसाठीही सहकार्य करणार आहे.

श्रीमती नुयी यांनी न्यूयॉर्कमधील पेप्सिकोच्या प्रकल्पाला भेट देण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना यावेळी दिले.
 कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा