महाराष्ट्रदिनी महाबळेश्वर-वाई येथील भिलार होणार ‘पुस्तकाचे गाव’ - मराठी भाषा मंत्री विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. 27 :  भाषेचे संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असून त्यासाठी आपण विविध उपायययोजना राबवित आहोत. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर-वाई येथील भिलार गावात ‘पुस्तकाचे गाव या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी केली.

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री श्री. तावडे बोलत होते. कार्यक्रमास आमदार राज पुरोहित, आमदार आशिष शेलार, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारविजेते मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार विजेत्या श्रीमती यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार विजेते श्याम जोशी यांना, तसेच श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक-लेखक उपस्थित होते.

यावेळी श्री. तावडे म्हणाले की, भिलार येथे पुस्तकाचे गाव तयार करताना येथे सर्व घरे निवडण्यात आली असून तिथे सर्व प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. यानिमित्ताने सर्व साहित्यिक, लेखकांनी दिवाळी अथवा इतर सुट्टीच्या कालावधीत या गावात जाऊन तेथील वाचकांशी संवाद साधल्यास वाचक आणि लेखकांचे नाते अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व शाळांनी  वर्षातून एकदा तरी पुस्तकाच्या गावात सहल नेऊन विद्यार्थ्यांना याची माहिती द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री या नात्याने श्री. तावडे यांनी यावेळी केले.मराठी भाषा विभागाने यापूर्वी ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे केला तर आज याच ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा होत आहे. राज्यभरात प्रत्येक महसूल विभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असल्याबद्दल श्री. तावडे यांनी समाधान व्यक्त केले.

संगणकाच्या महाजालावर अधिकाधिक मराठी मजकूर यावा तसेच विकिपीडियावर अधिकाधिक  वाचकांनी मराठीत लिहिण्याचे आवाहनही श्री. तावडे यांनी यावेळी केले. येत्या काळात युनिकोडचा वापर, विकिपीडियावर मराठीचा प्रचार-प्रसार करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्याचे आवाहनही श्री. तावडे यांनी  केले.

यावेळी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार यांनी ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी हा मराठी भाषा ही मध्यवर्ती संकल्पना असलेला सांगीतिक कार्यक्रमही यावेळी सादर केला. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या 11 पुस्तकांचे प्रकाशन करण्याबरोबरच विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाचे लोकार्पणही करण्यात आले.

स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार प्रदान

यावेळी मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात आले, ते पुढीलप्रमाणे-

एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरुप असलेले पुरस्कार - डॉ. प्रभा गणोरकर यांना कवी केशवसूत पुरस्कार, रमेश नाईक यांना राम गणेश गडकरी पुरस्कार, बा. भो. शास्त्री यांना हरी नारायण आपटे पुरस्कार, प्रकाश बाळ जोशी यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार, नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी यांना अनंत काणेकर पुरस्कार, प्रतिमा इंगोले यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, सुहास बहुळकर यांना न. चि. केळकर पुरस्कार, डॉ. उज्ज्वला सहाणे यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, सुधीर रसाळ यांना के. क्षीरसागर पुरस्कार, रमेश पतंगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, संजीवनी खेर यांना शाहू महाराज पुरस्कार, रामदास भटकळ आणि मृदुला प्रभुराम जोशी यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार, रमेश नारायण वरखेडे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, डॉ. नितीन मार्कण्डेय यांना वसंतराव नाईक पुरस्कार, श्रीराम पेडगावकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार, दिलीप घोंडगे यांना ना. गो. नांदापूरकर पुरस्कार, हेरंब कुलकर्णी यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, बी. के कुलकर्णी यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, संपादक द. दि. पुंडे यांना रा. ना. चव्हाण पुरस्कार, अनुवादक अश्विनी भिडे-देशपांडे यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, डॉ. गिरीश जोखोटिया यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, डॉ. माणिक बंगेरी यांना सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार, 50 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र पुरस्कार- इग्नेशिअस डायस यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार, नितीन थोरात यांना श्री. ना. पेंडसे पुरस्कार, ऋषिकेश वांगीकर यांना ग. ल. ठोकळ पुरस्कार, संदेश कुलकर्णी यांना ताराबाई शिंदे पुरस्कार, राजेंद्र सलालकर यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार, ज्ञानदा आसोलकर यांना बालकवी पुरस्कार, डॉ. भारती सुदामे यांना साने गुरूजी पुरस्कार, डॉ. सुमन नवलकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार, राजीव तांबे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार, तर मधुकर धर्मापुरीकर यांना ना. धों. ताम्हणकर आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

०००००


वर्षा फडके, डीएलओ, 27 फेब्रुवारी 2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा