‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या कारकिर्दीचा मागोवा
मुंबई, दि. 31 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या मागील 2 वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्याइन सर्व्हिस ऑफ पीपलया कॉफीटेबल बुकचे आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रि, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित लिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, चित्रपट अभिनेत्री जुही चावला, झी 24 तास वृत्तवाहिनीचे संपादक उदय निरगुडकर, कला दिग्दर्शक नितीन देसाई, निवृत्त सनदी अधिकारी शरद काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान - राज्यपाल

राज्यपाल श्री. राव यावेळी म्हणाले की, मागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या हितासाठी मोठे कार्य करता आले याचा विशेष आनंद वाटत आहे. राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशा बहुविधतेचा मोठा वारसा असून फक्त देशच नव्हे तर संपूर्ण जग महाराष्ट्राकडे एका वेगळ्या दृष्टीने पहात आहे. राज्याच्या विकासासाठी यापुढील काळातही आपण सर्वतोपरी योगदान देत राहू. विशेष अधिकाराच्या आधारे मागील साधारण दोन वर्षांच्या काळात राज्यातील आदिवासींसाठी विशेष कार्य करता आले, याचे समाधान वाटते. विद्यापीठांचा कुलपती या नात्याने शिक्षण क्षेत्रातही योगदान देण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील किमान दोन विद्यापीठे ही जगातील सर्वात्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत आहोत, असे ते म्हणाले. राजभवन परिसरात आपल्या कालावधीत शोध लागलेल्या बंकरच्या ठिकाणी महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडेल असे संग्रहालय उभे करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.        
  

राजभवन जनतेचे असल्याची भावना निर्माण - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यपालांच्या 2 वर्षाच्या कारकीर्दिचा मागोवा कॉफीटेबल बुकच्या रुपाने प्रसिद्ध होत आहे, ही अत्यंत महत्वाची घटना आहे. जे काम केलेय त्याचे दस्तऐवज करणे हे ब्रिटिशांकडून शिकण्यासारखे आहे. अशा दस्तावेजातून पुढील प्रशासकाला कार्याची निश्चित अशी दिशा मिळते. राज्यपालांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्याइन सर्व्हिस ऑफ पीपलहे कॉफीटेबल बुकही अशाच पद्धतीने दिशादर्शक ठरेल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यपाल हे स्वतः कायदेतज्ज्ञ आहेत, त्यामुळे राज्यात कायदे तयार होताना ते अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. राज्यात योजनांची नीट अंमलबजावणी होते की नाही याची ते स्वतः खात्री करतात. देशाच्या इतर राज्यात काही महत्वाच्या योजना असतील तर त्या आपल्या राज्यातही व्हाव्यात, असा त्यांचा आग्रह असतो. ते तेलंगणा राज्याचे रहिवासी आहेत. पण तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये पाणी वाटपाबाबत करार होत असताना त्यांनी आग्रहाने महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली.

महाराष्ट्र निर्मितीची घोषणा जिथे झाली ती राजभवनातील जागा दुर्लक्षित होती. राज्यपालांनी ही जागा  शोधून तिथे स्मारक उभे केले आणि राज्यातील नागरिकांना विशेष भेट दिली. सर्वसामान्य लोकांना राजभवनचे मोठे आकर्षण असते. पण हे राजभवन आतापर्यंत सर्वसामान्य लोकांना खुले नव्हते. राज्यपाल श्री. राव यांनी आपल्या कारकिर्दित राजभवन सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले करुन राजभवन हे लोकशाहीमध्ये जनतेचे आहे, अशी भावना निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


आदिवासींच्या हितासाठी विशेषाधिकारांचा प्रभावी वापरप्रतिभा पाटील

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील म्हणाल्या की, राज्यपाल हे शोभेचे पद नाही हे श्री. राव यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखविले आहे. त्यांना कार्यकारी अधिकार नसले तरी राज्याला वेळोवेळी मार्गदर्शन करुन तसेच त्यांना लाभलेल्या विशेषाधिकारांचा प्रभावी वापर करुन राज्याच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विशेषत: आदिवासींच्या हितासाठी त्यांनी आपल्या विशेष अधिकारांचा प्रभावी वापर केला, त्यामुळे आदिवासी विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय महाराष्ट्रात होऊ शकले. राजभवनात आदिवासींच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे, ही महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. विखे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही राज्यपाल श्री. राव यांच्या मागील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा गौरव केला. राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी आभार मानले. वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) मीनल जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्यासह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले
००००००


इर्शाद बागवान / डिएलओ / दिनांक ३१ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा