मंत्रिमंडळ निर्णय दि. 31 जानेवारी 2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

ग्रामपंचायतजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

शौचालयाच्या नियमित वापराचे
स्वसाक्षांकित प्रमाणपत्र देता येणार
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र सादर करता येण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने इच्छूक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये यासाठी आजचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम-1961 च्या कलम 16(1)(प) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 च्या कलम 14(1)(ज-5) नुसार निवडणूक लढवू इच्छिणारी व्यक्ती स्वत:च्या किंवा भाड्याच्या घरातील शौचालय किंवा सार्वजनिक शौचालय यांचा नियमित वापर करीत असणे आवश्यक आहे. इच्छूक उमेदवारांना शौचालयाचा नियमित वापर करत असल्याबाबतचे ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. यात कसूर करणारी व्यक्ती निवडून येण्यास आणि सदस्य होण्यास अपात्र ठरविण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी विहित वेळेत ग्रामसभेकडून शौचालयाच्या नियमित वापरासंदर्भात प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक असते. मात्र, त्यादृष्टीने ग्रामसभांचे आयोजन होणे देखील गरजेचे आहे. तथापि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 7 नुसार आयोजित करावयाच्या ग्रामसभांची मर्यादित संख्या तसेच त्यामधील तरतुदी लक्षात घेता ग्रामसभा आयोजित करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे केवळ ग्रामसभेच्या ठरावासोबत पंचायतीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे एखादा उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमाच्या कलम 16(1)(प) आणि कलम 14(1)(ज-5) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सुधारणेनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास शौचालयाच्या नियमित वापरासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र किंवा असे प्रमाणित करणाऱ्या ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा स्वसाक्षांकित प्रमाणपत्र आता देता येणार आहे.
----०----

नागरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

शौचालयाच्या नियमित वापराचे
स्वसाक्षांकित प्रमाणपत्र देता येणार

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र सादर करता येण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य होण्यासाठी शौचालय असणे व त्याचा वापर करीत असणे अशी तरतूद मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगर अधिनियम तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना त्यांच्याकडे शौचालय आहे व ते त्याचा नियमितपणे वापर करीत आहेत याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

आजच्या निर्णयामुळे उमेदवारांकडे शौचालय आहे व ते त्याचा नियमितपणे वापर करीत आहेत याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अथवा स्वयं प्रमाणन (Self-Certification) सादर करता येणार आहे.

----०----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा