राज्यातील दोन शहिदांना उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  
नवी दिल्ली 31 : उत्तराखंड येथे वर्ष 2013 मधील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्या प्राणांची आहूती देऊन भाविकांना वाचविणारे शहिद शशिकांत रमेश पवारशहिद गणेश अहिरराव या जवानांना आज मरणोत्तर उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान करण्यात आले. हे पदक शहिद जवान शशिकांत पवार यांची पत्नी  श्रीमती सुवर्णा शशिकांत पवार तसेच  शहीद गणेश अहिरराव यांची पत्नी श्रीमती योगिता गणेश अहिरराव यांनी  स्वीकारले.  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या 12 व्या स्थापनादिनानिमित्त विज्ञान भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गृह राज्य मंत्री किरेण रीजीजू अध्यक्षस्थानी होते.  

उत्तराखंडमधील नैसर्गीक आपत्तीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अभूतपूर्व कामगिरी करून येथे अडकलेल्या भाविकांना सुखरूप बाहेर काढले होते. या कार्यादरम्यान राज्यातील जवान शशिकांत रमेश पवार आणि गणेश अहिरराव हे शहीद झाले.  हेड कॉस्टेबल अन्ना जलिंदर तांबे यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.


लंडनमधील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास सामाजिक न्याय मंत्र्यांचे अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 31 : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी काल (दि. 30 जानेवारी) लंडनमधील लॅम्बेथ येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा परिसरास भेट देऊन महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले. 

श्री. बडोले हे सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी दि. 30 जानेवारी 2017 रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा स्थळी भेट दिली. यावेळी लंडनमधील लॅम्बेथचे माजी महापौर व लॅम्बेथ बसवेश्वरा फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. नीरज पाटील यांनी ब्रिटनमधील भारतीय समाजाच्या वतीने श्री. बडोले यांचे स्वागत केले. ब्रिटनमधील महाराष्ट्रीय नागरिक तसेच कन्नड डायस्पोराच्या सदस्यही यावेळी उपस्थित होते.  लंडनमधील लॅम्बेथ महात्मा बसवेश्वर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.  


महात्मा बसवेश्वर यांचे लोकशाही व सामाजिक न्यायासंदर्भातील योगदानाची माहिती देऊन श्री. बडोले म्हणाले की, ऐतिहासिक अशा लंडन शहरात ब्रिटीश संसदेच्या पार्श्वभूमीवर थेम्स नदी किनाऱ्यावर उभारण्यात आलेला भारतीय तत्त्वज्ञानी व समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा पाहून खूप आनंद झाला, अशी भावना श्री. बडोले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकृती सादर करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 : 57 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) 2016-17 येथील जहांगीर आर्ट गॅलरीत दि. 7 ते 13 मार्च 2017 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी कलाकृती मागविण्यात येत आहे.


प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील कलावंतांना कलाकृती पाठविता येईल. बक्षीसपात्र कलाकृतींना प्रत्येकी 10 हजार रुपयांची एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहे. तरी इच्छूक कलावंतांनी 8, 9 व 10 फेब्रुवारी, 2017 सकाळी 10.30 वा. ते 4.00 वा. दरम्यान सर ज.जी. कला शाळा आवार, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, दा.नौ. मार्ग, मुंबई-400001 येथे आपल्या कलाकृती सादर कराव्या, असे आवाहन प्रदर्शन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

मंत्रिमंडळ निर्णय दि. 31 जानेवारी 2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

ग्रामपंचायतजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

शौचालयाच्या नियमित वापराचे
स्वसाक्षांकित प्रमाणपत्र देता येणार
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र सादर करता येण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने इच्छूक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये यासाठी आजचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम-1961 च्या कलम 16(1)(प) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 च्या कलम 14(1)(ज-5) नुसार निवडणूक लढवू इच्छिणारी व्यक्ती स्वत:च्या किंवा भाड्याच्या घरातील शौचालय किंवा सार्वजनिक शौचालय यांचा नियमित वापर करीत असणे आवश्यक आहे. इच्छूक उमेदवारांना शौचालयाचा नियमित वापर करत असल्याबाबतचे ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. यात कसूर करणारी व्यक्ती निवडून येण्यास आणि सदस्य होण्यास अपात्र ठरविण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी विहित वेळेत ग्रामसभेकडून शौचालयाच्या नियमित वापरासंदर्भात प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक असते. मात्र, त्यादृष्टीने ग्रामसभांचे आयोजन होणे देखील गरजेचे आहे. तथापि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 7 नुसार आयोजित करावयाच्या ग्रामसभांची मर्यादित संख्या तसेच त्यामधील तरतुदी लक्षात घेता ग्रामसभा आयोजित करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे केवळ ग्रामसभेच्या ठरावासोबत पंचायतीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे एखादा उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमाच्या कलम 16(1)(प) आणि कलम 14(1)(ज-5) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सुधारणेनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास शौचालयाच्या नियमित वापरासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र किंवा असे प्रमाणित करणाऱ्या ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा स्वसाक्षांकित प्रमाणपत्र आता देता येणार आहे.
----०----

नागरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

शौचालयाच्या नियमित वापराचे
स्वसाक्षांकित प्रमाणपत्र देता येणार

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याचे स्वसाक्षांकित प्रमाणपत्र सादर करता येण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य होण्यासाठी शौचालय असणे व त्याचा वापर करीत असणे अशी तरतूद मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगर अधिनियम तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना त्यांच्याकडे शौचालय आहे व ते त्याचा नियमितपणे वापर करीत आहेत याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

आजच्या निर्णयामुळे उमेदवारांकडे शौचालय आहे व ते त्याचा नियमितपणे वापर करीत आहेत याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अथवा स्वयं प्रमाणन (Self-Certification) सादर करता येणार आहे.

----०----

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक अलंकरण समारंभ संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 : 2014 च्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींनी पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल जाहिर केलेले राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर केलेले पोलीस पदक अलंकरण समारंभ आज पोलीस मुख्यालयात येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पोलीस दलात उल्लेखनीय सेवेबद्दल प्रभात रंजन, महासंचालक, (न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई, जनार्दन ठोकळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) सशस्त्र पोलीस, नायगांव, बृहन्मुंबई, दिलीप घाग, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त) विशेष शाखा, मुंबई यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी डॉ. प्रज्ञा सरवदे, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई, कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.व्ही.आय.पी. सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रकाश मुत्याळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर, यादवराव पाटील, पोलीस उप अधीक्षक (दिवंगत) यांच्या पत्नी श्रीमती सुनिता पाटील, अहमदनगर, विलास जगदाळे, सहाय्यक आयुक्त (सेवानिवृत्त), राज्य गुप्तवार्ता विभाग, ठाणे शहर, रघुनाथ फुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर, काळूराम धांडेकर, पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त), सोलापूर शहर, पंडीत राठोड, राखीव पोलीस निरीक्षक, परभणी, ज्ञानेश्वर भूमकर, पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), मुंबई, आनंद चोरगे, पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), मुंबई, अरुण मोरे, पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), पुणे शहर, शामराव तुरंबेकर, पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), ठाणे ग्रामीण, रमेश वराडे, पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), नंदूरबार, विनोद अंबरकर, बिनतारी पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), नाशिक शहर, किशोर बोरसे, गुप्तवार्ता अधिकारी (सेवानिवृत्त), राज्य गुप्तवार्ता विभाग, मालेगाव, परशुराम राणे, पोलीस उप निरीक्षक, ठाणे शहर, पंढरीनाथ मरकंटे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (दिवंगत) यांच्या पत्नी श्रीमती प्रभावती मरकंटे, परभणी, अर्जुन सुतार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), मुंबई, भानुदास कदम, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), विशेष शाखा, मुंबई, मंचक बचाटे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), परभणी, प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), रा.रा.पो. बल, गट क्र.2, पुणे, निना नारखेडे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सेवानिवृत्त), रा.रा.पो.बल, गट क्र.13, नागपूर, सुरेश पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, सोलापूर शहर, हेमंतकुमार पांडे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, नागपूर शहर, शंकर देवकर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, हिंगोली, काशिनाथ जाधव, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, नंदूरबार, चंद्रकांत शिंदे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, सातारा, संभाजी कुंभार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, सांगली, मुश्ताक अली, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, अकोला, दत्तात्रय जाधव, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, राहूल सोनावणे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.1, पुणे, बब्रुवान माने, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.1, पुणे, उदय गांवकर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.1, पुणे, डेवीड लोबो, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.2, पुणे, अशोक भोगण, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.2, पुणे, जयसिंग घाडगे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.2, पुणे, सोपान गोल्हार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.5, दौंड, बाळकृष्ण देसाई, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.7, दौंड, राजेंद्र अवताडे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, रा.रा.पो.बल, गट क्र.9, अमरावती, राजाराम सुर्वे, पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक, पुणे यांना राज्यपालांच्या हस्ते पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले.


या समारंभास गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतिश माथुर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पोलीस पदक प्राप्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्ररथाद्वारे मतदार जागृतीला मुंबईत ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 31 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे शहरात ठिकठिकाणी मतदार जागृती करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी पार्कवर झालेल्या संचलनात या चित्ररथाचा समावेश होता.  73 आणि 74 व्या  राज्य घटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या आणि सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सर ज. जी. कला महाविद्यालयाने त्याची निर्मिती केली आहे. इतर विविध माध्यमांतूनही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयन्त केल जात आहे. चित्ररथ त्याचाच एक भाग आहे. चित्ररथाची आकर्षक रचना व रंगसंगतीमुळे त्याकडे लक्ष वेधले जात आहे. चित्ररथावर एलएडी पडता असून त्यावर विविध ध्वनिचित्रफिती व जागृतीपर संदेशही दाखविण्यात येत आहेत.  

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर संचलन झाल्यानंतर हा चित्ररथ गेट वे ऑफ इंडिया, हजी अली व दादर येथे नेण्यात आला होता. आज तो वांद्रे (पूर्व) येथे असून या सर्व ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. हा चित्ररथ 6 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुंबईत असेल त्यानंतर ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी नेण्यात येईल.
येथे असेल चित्ररथ
1 फेब्रुवारी 2017:  बॅन्डस्टँड (वांद्रे पश्चिम)
2 फेब्रुवारी 2017: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली)
3 फेब्रुवारी 2017: जुहू चौपाटी (सांताक्रुझ)
4 फेब्रुवारी 2017: सागर कुटीर (वर्सोवा चौपाटी)
5 फेब्रुवारी 2017: डायमंड गार्डन (चेंबुर)
6 फेब्रुवारी 2017: मुलुंड
मतदान करा... इतरांनाही सांगा!
चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जागृतीस मुंबईत ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण सर्वांनी नक्की मतदान करावे आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे.
ज. स. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त
०-०-०
(Jagdish More, PRO, SEC)'वीजेचा नियंत्रित आणि सुरक्षित वापर' या विषयावर 'दिलखुलास'मध्ये मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 : वीजेच्या सुरक्षित वापराविषयी जनजागृती होण्यासाठी आणि वीजेमुळे  अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आदी विषयांवर राज्याचे उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाचे मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे यांची मुलाखत दिलखुलास' या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. ही मुलाखत सूत्रसंचालक कल्पना साठे यांनी घेतली आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास कार्यक्रमात ही विशेष मुलाखत बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार या दिवशी दिनांक 1,2 आणि 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

०००००

निर्मलाताई आठवले यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31 :  स्वाध्याय परिवाराच्या मार्गदर्शक श्रीमती निर्मलाताई आठवले यांच्या निधनाने आध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासोबतीने  निर्मलाताईंनी स्वाध्याय परिवाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. दादांच्या निधनानंतर त्यांनी परिवाराच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात राहून स्वाध्यायी बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने आध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे एक निस्पृह व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 31 :  मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.

सन 2015-2016 व 2016-2017 च्या जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू (एक पुरुष/एक महिला खेळाडू), गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपो शेजारी, धारावी, सायन (प), मुंबई-400 017 येथून विनामुल्य प्राप्त करुन घेता येणार आहेत.


सदर पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याबाबतचे आवाहन यापूर्वीही करण्यात आले आहे. परंतू खेळाडू व मार्गदर्शक यांचेकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने जिल्हा क्रीडा पुरस्कार 2015-16 करीता पुन:श्च अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच यापूर्वी सादर केलेल्या अर्जामध्ये अर्जदारास अतिरिक्त कागदपत्रे जोडावयाची असल्यास दिनांक 28/02/2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दुरध्वनी क्र.022-65532373) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे कळविले आहे.

‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या कारकिर्दीचा मागोवा
मुंबई, दि. 31 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या मागील 2 वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्याइन सर्व्हिस ऑफ पीपलया कॉफीटेबल बुकचे आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रि, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित लिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, चित्रपट अभिनेत्री जुही चावला, झी 24 तास वृत्तवाहिनीचे संपादक उदय निरगुडकर, कला दिग्दर्शक नितीन देसाई, निवृत्त सनदी अधिकारी शरद काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान - राज्यपाल

राज्यपाल श्री. राव यावेळी म्हणाले की, मागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या हितासाठी मोठे कार्य करता आले याचा विशेष आनंद वाटत आहे. राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशा बहुविधतेचा मोठा वारसा असून फक्त देशच नव्हे तर संपूर्ण जग महाराष्ट्राकडे एका वेगळ्या दृष्टीने पहात आहे. राज्याच्या विकासासाठी यापुढील काळातही आपण सर्वतोपरी योगदान देत राहू. विशेष अधिकाराच्या आधारे मागील साधारण दोन वर्षांच्या काळात राज्यातील आदिवासींसाठी विशेष कार्य करता आले, याचे समाधान वाटते. विद्यापीठांचा कुलपती या नात्याने शिक्षण क्षेत्रातही योगदान देण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील किमान दोन विद्यापीठे ही जगातील सर्वात्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत आहोत, असे ते म्हणाले. राजभवन परिसरात आपल्या कालावधीत शोध लागलेल्या बंकरच्या ठिकाणी महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडेल असे संग्रहालय उभे करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.        
  

राजभवन जनतेचे असल्याची भावना निर्माण - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यपालांच्या 2 वर्षाच्या कारकीर्दिचा मागोवा कॉफीटेबल बुकच्या रुपाने प्रसिद्ध होत आहे, ही अत्यंत महत्वाची घटना आहे. जे काम केलेय त्याचे दस्तऐवज करणे हे ब्रिटिशांकडून शिकण्यासारखे आहे. अशा दस्तावेजातून पुढील प्रशासकाला कार्याची निश्चित अशी दिशा मिळते. राज्यपालांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्याइन सर्व्हिस ऑफ पीपलहे कॉफीटेबल बुकही अशाच पद्धतीने दिशादर्शक ठरेल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यपाल हे स्वतः कायदेतज्ज्ञ आहेत, त्यामुळे राज्यात कायदे तयार होताना ते अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. राज्यात योजनांची नीट अंमलबजावणी होते की नाही याची ते स्वतः खात्री करतात. देशाच्या इतर राज्यात काही महत्वाच्या योजना असतील तर त्या आपल्या राज्यातही व्हाव्यात, असा त्यांचा आग्रह असतो. ते तेलंगणा राज्याचे रहिवासी आहेत. पण तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये पाणी वाटपाबाबत करार होत असताना त्यांनी आग्रहाने महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली.

महाराष्ट्र निर्मितीची घोषणा जिथे झाली ती राजभवनातील जागा दुर्लक्षित होती. राज्यपालांनी ही जागा  शोधून तिथे स्मारक उभे केले आणि राज्यातील नागरिकांना विशेष भेट दिली. सर्वसामान्य लोकांना राजभवनचे मोठे आकर्षण असते. पण हे राजभवन आतापर्यंत सर्वसामान्य लोकांना खुले नव्हते. राज्यपाल श्री. राव यांनी आपल्या कारकिर्दित राजभवन सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले करुन राजभवन हे लोकशाहीमध्ये जनतेचे आहे, अशी भावना निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


आदिवासींच्या हितासाठी विशेषाधिकारांचा प्रभावी वापरप्रतिभा पाटील

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील म्हणाल्या की, राज्यपाल हे शोभेचे पद नाही हे श्री. राव यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखविले आहे. त्यांना कार्यकारी अधिकार नसले तरी राज्याला वेळोवेळी मार्गदर्शन करुन तसेच त्यांना लाभलेल्या विशेषाधिकारांचा प्रभावी वापर करुन राज्याच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विशेषत: आदिवासींच्या हितासाठी त्यांनी आपल्या विशेष अधिकारांचा प्रभावी वापर केला, त्यामुळे आदिवासी विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय महाराष्ट्रात होऊ शकले. राजभवनात आदिवासींच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे, ही महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. विखे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही राज्यपाल श्री. राव यांच्या मागील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा गौरव केला. राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी आभार मानले. वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) मीनल जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्यासह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले
००००००


इर्शाद बागवान / डिएलओ / दिनांक ३१ जानेवारी २०१७