महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ - पांडुरंग फुंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 31: रब्बी हंगाम 2016-17च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

याबाबत अधिक माहिती देताना कृषिमंत्री फुंडकर म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2016-17 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या सहभागाची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर, 2016 अशी होती.  आता केंद्र शासनाने 10 जानेवारी, 2017 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. राज्यातील अधिकाधीक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ देण्याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता, असेही श्री. फुंडकर  यांनी यावेळी सांगितले.

या संदर्भात अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हानिहाय प्रतिनिधी तसेच संबंधित विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी व नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
०००

अजय जाधव..31.12.2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा