आजरा,राधानगरी,भुदरगड येथील पोलीस स्टेशनचे बांधकाम प्राधान्यक्रमाने पूर्ण करावे - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई,दि.30: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड येथील पोलीस स्टेशन इमारतीचे बांधकाम उपलब्ध निधीनुसार टप्याटप्यानुसार प्राधान्यक्रमाने लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.

मंत्रालयातील दालनात आजरा, राधानगरी, भुदरगड येथील पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत नादुरूस्त असल्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. केसरकर बोलत होते. यावेळी अपर पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण, कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक सतीश माने, गृह विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट, वित्त विभागाचे उपसचिव ज. अ. शेख, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माणचे उपअभियंता बी.एस.जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले की, पोलीस विभागाच्या गृहनिर्माण सोसायटीसाठीच्या बांधकामासाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्रपणे नियोजन करावे. त्यामुळे वेळेत बांधकामे पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यावरदेखील देखभाल,दुरूस्ती नियमितरित्या करण्यात यावी. तसेच राज्यातील नागरीकांच्या सोईसाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात आधुनिक सोईसुविधायुक्त अभ्यागत कक्ष असणे आवश्यक आहे. या अभ्यागत कक्षासाठीचे आधुनिक डिजाइन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तयारी करावी अशी सूचना यावेळी श्री. केसरकर यांनी केली. पोलीस विभागाच्या सक्षमीकरण तसेच सोईसुविधांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा