समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन स्थळावर जेट्टी उभारण्यास लवकरच प्रारंभ करणार - राज्यमंत्री मदन येरावार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 30 : राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत लवकरच जेट्टी उभारण्यास प्रारंभ करणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची जेट्टी उभारण्याबाबत पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी श्री.येरावार बोलत होते. यावेळी एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, पर्यटन विभागाचे सह सचिव दिनेश दळवी, महाराष्ट्र मेरीटाईम् बोर्डाचे मुख्य अभियंता एच.एस.पगारे आदी उपस्थित होते.

श्री. येरावार म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे प्रस्तावित केलेल्या 73 जेट्टींपैकी 12 ते 15 जेट्टीची कामे तत्काळ सुरु करावीत. यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व एमटीडीसी यांनी संयुक्तपणे निधी उपलब्ध करुन द्यावा. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अर्नाळा, केळवा/सातपाटी, रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा, दिवे आगार, रेवदंडा, काशिद, रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ, भाटे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला, मालवण (नवीन ठिकाणी), तारकर्ली (स्कुबा ड्रायव्हिंग इन्स्टिट्युट जवळ), मोचेमढ, शिरोडा, मिठाबाव या ठिकाणच्या जेट्टीची कामे अग्रक्रमाने करणार असल्याचे श्री.येरावार यांनी सांगितले.

राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून या किनारपट्टी भागात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यासाठी आणखी जेट्टी उभारण्याच्या प्रस्तावाससुद्धा लवकरच मान्यता मिळणार असल्याचे यावेळी श्री.येरावार यांनी सांगितले.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा