अन्न, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या निर्देशानंतर 812 स्वस्तधान्य दुकानांवर कारवाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

 वजन व मापांची पडताळणी न करता धान्य विक्री करणाऱ्यांवर खटले


मुंबई, दि. 30 : स्वस्त धान्य दुकानातील वजन व मापांची पडताळणी न करता धान्य विक्री करणाऱ्या राज्यातील 3837 दुकानांची वैध मापन शास्त्र यंत्रणेने तपासणी करून 812 दुकानांवर खटले दाखल केले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री गिरीश बापट यांना दौऱ्यात अशा प्रकारची विक्री होत असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. बापट यांना त्यांच्या दौऱ्यात राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील वजन व मापांची पडताळणी न करता धान्य विक्री होत असल्याचे आढळून आले होते. त्यांनी ही बाब वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या निर्दशनास आणून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. श्री. गुप्ता यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत राज्यातील सुमारे 3837 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये माल कमी दिल्याबद्दल 3, वजन व मापांची तपासणी व मुद्रांकन न करता त्याचा वापर केल्याबद्दल 692, पॅकबंद वस्तू नियम भंगाबाबत 30 व इतर नियम मोडल्याबद्दल 87 अशा एकूण 812 दुकानांवर खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.  
           
स्वस्त धान्य दुकानदारांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांनी जागरूक रहावे. तसेच याबाबत तक्रार असल्यास  वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेल dclmms@yahoo.in  किंवा dclmms_complaints@yahoo.com,dyclmmumbai@yahoo.indyclmkokan@yahoo.indyclmnashik@yahoo.comdyclmpune@yahoo.in,dyclmaurangabad@yahoo.indyclmamravati@yahoo.indyclmnagpur@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
 ००० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा