महाराष्ट्रात मंगेशकर 'स्कूल ऑफ म्युझिक' सुरु करण्याचा मानस - सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदानमुंबईदि. ३० : संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटुंबियांनी दिलेले योगदान पाहता महाराष्ट्रात मंगेशकर स्कुल ऑफ म्युझिक सुरु करण्याचा राज्य शासनाचा मानस आहेयासाठी मंगेशकर कुटुंबिय आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य घेतले जाईलअसे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले.
ज्येष्ठ संगीतकारसंगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना सन २०१६ या वर्षाचा राज्य शासनाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथील आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.  यावेळी ज्येष्ठ संगीतकार खय्याम आणि ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे,  महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. तावडे म्हणाले कीसांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून पुरस्काराचे स्वरूप कसे असेल  त्यातून पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान होईल यावर जास्त भर दिला. यावर्षीच्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी एकमताने निवड समितीने ज्येष्ठ संगीतकार उत्तमसिंग यांची निवड केली यावरून संगीतकला या क्षेत्रात भाषा महत्वाची नसते हे दिसून आले.


यावेळी पुरस्कार विजेते उत्तम सिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कीलता मंगेशकर पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी एक आशीर्वाद असून आज मी स्वतःला लतारत्न असल्याचे मानतो. गेल्या ७० वर्षात आजपर्यंत अनेकांना लतादीदींबरोबर काम करण्याची इच्छा होतीपण मी एक असा भाग्यवान आहे की मला लता दीदींचा हा आशीर्वाद प्रत्येक चित्रपटासाठी मिळाला. या पुरस्काराच्या निमित्ताने मीमाझे आई-वडील माझे गुरुमाझे सर्व सहकारी यांचे आभार मानतो. या पुरस्कारामुळे मी खऱ्या अर्थाने आज धन्य झालोअसे सांगून उत्तमसिंग यांनी राज्य शासनाचे व पुरस्कार समितीचे आभार मानले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोखमानचिन्हमानपत्र असे आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी हा पुरस्कार राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात येतो. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने श्री.उत्तम सिंग यांच्या नावास अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव वल्सा नायर सिंहसंगीतकार श्रीधर फडकेगायिका आशा खाडिलकर,गीतकार स्वानंद किरकिरेसंगीतकार अजय व अतुल गोगावले आणि गायिका श्रेया घोषाल यांचा समावेश होता.

या पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने ʻदिल तो पागल हैʼ हा लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. या संगीत कार्यक्रमाचे संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते तर संहिता आणि निवेदन दीप्ती भागवत यांचे होते. हषिकेश रानडेआर्या आंबेकरजयदिप बगवाडकरमधूरा कुंभार आणि इतर गायक निवेदक यांच्यासह ३५ कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
                           ०००००

मुंबई व ठाण्यामध्ये आठवडी बाजाराची संख्या वाढविणार - सदाभाऊ खोत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबईदि. 30 : मुंबई व ठाण्यामध्ये संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार अभियानाअंतर्गत आठवडी बाजारांची संख्या वाढविणार असल्याचे  प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार अभियानांतर्गत आठवडी बाजारांकरिता मुंबई महापालिकेकडे जागा उपलब्ध करुन देण्याबाबत व शेतकरी उत्पादक कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. त्यावेळी श्री.खोत बोलत होते. यावेळी मुंबई महापालिका उपायुक्त (विशेष) प्रकाश पाटीलकृषी उपसचिव का. गो. वळवीपणन मंडळाचे सहायक व्यवस्थापक डॉ.भास्कर पाटीलशेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. खोत म्हणाले मुंबई व ठाणे शहरामध्ये नागरिकांना चांगला, स्वच्छ, ताजा भाजीपाला मिळण्यासाठी जानेवारी 2017 पर्यंत शंभर ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणार आहे. तसेच  आठवडी बाजारासाठी मुंबई शहरामध्ये काही अडीअडचणी आल्यास महापालिका आयुक्तांशीही चर्चा करणार असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले.

श्री. खोत म्हणाले कीमुंबई शहरात भाजीपाला आणताना शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाहने वाहतूक पोलीसांकडून अडवली जातात याबाबत उपायुक्त वाहतुक यांना सुचना करणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अन्य अडीअडचणी लवकरात लवकर सोडवणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आठवडी बाजारात चांगल्या प्रतीचा भाजीपाला आणावा. आठवडी बाजारातील प्रत्येक स्टॉलला पणन मंडळाचे पत्र असावेशेतकऱ्यांना ओळखपत्र आवश्यक आहे. प्रत्येक आठवडी बाजार स्टॉलची संख्या व शेतकरी कंपन्या निश्चित करुन ठिकाणेही निश्चित करणार आहेत. प्रत्येक आठवडी बाजारात एक महिला बचत गटाचा स्टॉल उभारण्यात येईल, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीजिल्हा उपनिबंधकजिल्हा पणन अधिकारीप्रकल्प संचालक (आत्मा) यांची दरमहा संयुक्त बैठक घेऊन शेतकरी आठवडी बाजाराबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश ही श्री.खोत यांनी दिले.

००००

अन्न, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या निर्देशानंतर 812 स्वस्तधान्य दुकानांवर कारवाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

 वजन व मापांची पडताळणी न करता धान्य विक्री करणाऱ्यांवर खटले


मुंबई, दि. 30 : स्वस्त धान्य दुकानातील वजन व मापांची पडताळणी न करता धान्य विक्री करणाऱ्या राज्यातील 3837 दुकानांची वैध मापन शास्त्र यंत्रणेने तपासणी करून 812 दुकानांवर खटले दाखल केले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री गिरीश बापट यांना दौऱ्यात अशा प्रकारची विक्री होत असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. बापट यांना त्यांच्या दौऱ्यात राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील वजन व मापांची पडताळणी न करता धान्य विक्री होत असल्याचे आढळून आले होते. त्यांनी ही बाब वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या निर्दशनास आणून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. श्री. गुप्ता यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत राज्यातील सुमारे 3837 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये माल कमी दिल्याबद्दल 3, वजन व मापांची तपासणी व मुद्रांकन न करता त्याचा वापर केल्याबद्दल 692, पॅकबंद वस्तू नियम भंगाबाबत 30 व इतर नियम मोडल्याबद्दल 87 अशा एकूण 812 दुकानांवर खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.  
           
स्वस्त धान्य दुकानदारांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांनी जागरूक रहावे. तसेच याबाबत तक्रार असल्यास  वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेल dclmms@yahoo.in  किंवा dclmms_complaints@yahoo.com,dyclmmumbai@yahoo.indyclmkokan@yahoo.indyclmnashik@yahoo.comdyclmpune@yahoo.in,dyclmaurangabad@yahoo.indyclmamravati@yahoo.indyclmnagpur@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
 ००० 

पुण्याला स्टार्टअपची राजधानी करण्यासाठी राज्य शासन धोरण आखणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

लोकसत्ताच्या बदलता महाराष्ट्र परिसंवादाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोपमुंबई, दि. 30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस इकॉनॉमी तयार करण्याचा धरलेल्या आग्रहामुळे  स्टार्टअपसाठी नंदनवन खुले झाले आहे. सध्या देशातील सर्वाधिक स्टार्टअप हे मुंबई, पुण्यात होतात. मात्र, आपण त्याची योग्य नोंद ठेवत नाही. महाराष्ट्रात स्टार्टअपची राजधानी बनण्याची ताकद असून  पुढील काळात पुणे ही देशातील स्टार्टअपची राजधानी करण्यासाठी राज्य शासन धोरण आखणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

लोकसत्ताच्या वतीने स्टार्ट अपविषयावर आयोजित बदलता महाराष्ट्रपरिसंवादाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, केसरी पाटील, लोकसत्ताच्या प्रकाशिका वैदेही ठकार, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गिस आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आता ज्या परिस्थितीतून जग, भारत चालला आहे, त्यामध्ये संधी खूप मोठी आहे. या संधीचा योग्य उपयोग करणे व त्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या तीनही क्षेत्रात स्टार्टअपला खूप संधी उपलब्ध आहे. सध्या सेवा क्षेत्र मोठ्या वेगाने वाढत असून एकूण देशांतर्गत उत्पादनामधील त्याचा हिस्सा 7 टक्क्यापर्यंत पोचला आहे. सेवा क्षेत्रात स्टार्टअपसाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे. स्टार्टअप म्हणजे आलेली संधी समजून घेऊन त्याचा उपयोग करून त्याला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी त्या संधींचा विकास करणे होय. त्यासाठी कल्पना व्यावसायिक स्तरावर व्यवहार्य करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्याला कॅशलेस इकॉनॉमीने कशा प्रकारे जगता येईल, त्याला कर्ज मिळाल्यानंतर त्याचा विनियोग कशा प्रकारे कॅशलेस करता येईल, त्यासाठी स्टार्टअप तयार करता येईल. कृषी क्षेत्रात ई- मार्केटिंगमुळे वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप सुरू करता येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


स्टार्टअपसाठी सुयोग्य वातावरण व व्यवस्था तयार करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण तयार जाहीर करणार असून त्यामध्ये स्टार्टअपसाठी सर्व सोयी देण्यात येणार आहेत. सध्या राज्य शासनाने मोठ्या रोजगार संधी व स्टार्टअपची शक्यता असलेल्या वेगवेगळ्या 11 क्षेत्रातील 110 कल्पना तयार करत आहोत. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या व्यावसायिक जागांमधील 5 टक्के जागा स्टार्टअपसाठी सर्व व्यवस्थांसह द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच पुण्यात स्टार्टअप पार्क उभारण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. तसेच राज्यात स्टार्टअप गावे करण्याचाही विचार सुरू आहे.  असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लोकसत्ताने आयोजित केलेला स्टार्टअप विषयावरील  हा परिसंवाद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिसंवादाचा उपयोग राज्याचे धोरण ठरविण्यासाठी होणार असून या परिसंवादातील प्रमुख मुद्द्यांचा व सूचनांचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल.

यावेळी खेळ संस्कृती : आज आणि उद्याया पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. लोकसत्ताचे संपादक श्री. कुबेर यांनी यावेळी दोन दिवसाच्या परिसंवादातील महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती दिली. श्रीमती ठकार व श्री. केसरी पाटील यांनी स्वागत केले, तर श्री. वर्गिस यांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.
०००

पुण्याबरोबरच नागपूर व औरंगाबाद येथेही उद्योजकांनी गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  चाकण औद्योगिक परिसातील होरीबा इंडीया टेक्निकल सेंटरचे उद्घाटन
पुणे, दि. 30 : गेल्या दहा वर्षात देशात होरीबा कंपनीने आपल्या उत्पादन व सेवा क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. पुणे परिसरात ॲटोमोबाईलच्या 80 टक्के सुट्या भागांची निर्मिती होते. होरीबा या कंपनीने चाकण या परिसरात प्रकल्प सुरू केल्यामुळे निश्चितच याचा फायदा होईल. महाराष्ट्र हे उद्योजकांसाठी नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे, यापुढे होरीबाने नागपूर व औरंगाबाद सारख्या ठिकाणी गुंतवणूक करावी. शासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

होरीबा इंडीया कंपनीची भारतातील दशकपूर्ती व चाकण औद्योगिक परिसरात नव्याने सुरु केलेल्या होरीबा इंडीया टेक्निकल सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सू, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार संजय भेगडे, होरीबा ग्रुपचे चेअरमन डॉ. आर्त होरीबा, होरीबा इंडीया कंपनीचे चेअरमन डॉ. जय हकू, राजू गौतम उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ॲटोमोबाईलच्या उत्पादनात भारत जगात आग्रक्रमावर असून या क्षेत्रातील भारताची बाजारपेठही मोठी आहे. ही बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात आणखी गुंतवणुकीला वाव आहे. देशात महाराष्ट्र ॲटोमोबाईल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे आणि परिसरात यातील 80 टक्के उत्पादने तयार होतात. जपानमधील उद्योजकांसाठी महाराष्ट्र कायमच पहिल्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे. पुण्याबरोबरच देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असणारे नागपूर व सर्व सुविधांनीयुक्त असणाऱ्या औरंगाबाद शहरातही होरीबा व अन्य उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी प्राधान्य द्यावे. पुण्यातील ॲटोमोबाईल क्षेत्र आपल्या पंतप्रधानांचे मेक इन इंडीयाचे स्वप्न साकार करत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असून मनुष्यबळ हीच आपल्या देशाची ताकत आहे. याच जोरावर येत्या काही वर्षात शंभर टक्के मेक इन इंडीयाकडे आपली वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक गुंतवणुकीसाठी आणि विस्तारासाठी महाराष्ट्र हे अतिशय चांगले ठिकाण असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, जपानसह इतर देशातील उद्योजकांनी महाराष्ट्रातील पोषक वातावरणाचा फायदा करुन घ्यावा. उद्योजकांना सर्व सुविधा पुरविण्यास महाराष्ट्र शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

जपानचे राजदूत श्री. हिरामात्सू म्हणाले, भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीचे संबंध अतिशय दृढ असून आर्थिक संबंधही विस्तारत आहेत. जगातील जपानच्या एकूण गुंतवणुकीच्या सर्वाधिक गुंतवणूक भारतात आहे. पुणे हे भारतातील ॲटोमोबाईल हब असून औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. चाकण औद्योगिक परिसरातही उद्योजकांची गुंतवणुकीला पसंती आहे. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा प्राधान्याने पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. होरीबा यांनी केले. तर शेवटी आभार राजीव गौतम यांनी मानले.

०००००

येत्या काळात गड-किल्ले स्वच्छता मोहीम राबविणार – श्री. विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई,‍ दि. 30 : महाराष्ट्रातील गड-किल्यांचे संवर्धन चांगल्या पध्दतीने व्हावे यासाठी येत्या काळात गड-किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.

आज पु. ल. देशपांडे. कला अकादमी येथे गड-किल्ले संवर्धन समिती यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी आणि गड संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की गड-किल्ले संवर्धन अंतर्गत महाराष्ट्रातील २० किल्यांचे जीपीएस मॅपींग करण्यात येणार आहे. तर याबरोबर गड-किल्ले स्वच्छता मोहिमही राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये गड संवर्धन समितीच्या सदस्यांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे. गड-किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करताना काय करावे आणि करु नये याबाबतची माहिती स्वच्छता मोहीमेअंतर्गत देण्यात यावी.

गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे. यासाठीच गड-किल्ले संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत ठरविण्यात आलेली कामे नियोजन पध्दतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
००० 

अवयवदान अभियानात उत्कृष्ट कामगिरीबाबात केंद्र शासनाकडून राज्याचा गौरव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 30 : आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमीत्त आज केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय अवयव आणि टिशु प्रत्यारोपण संस्थेद्वारे  अवयवदानाबाबत समाजात प्रभावीपणे प्रबोधन करून जागृती निर्माण केल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाला प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे अवयवदान अभियान ऑगस्ट महिन्यात राज्यभर राबविण्यात आले होते. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानानंतर १३१ किडनी, 104 यकृत, १ फुफ्फुस, १ स्वादुपिंड आणि ३५ हृदय इतक्या अवयवांचे दान करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यभर चालविलेल्या अभियानानंतर अवयवदानात दुपटीने वाढ झाली आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालये तसेच रूग्णालयात राबविलेल्या या अभियानामुळे नागरिकांत जागृती झाली आहे. राज्य शासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तामिळनाडूबरोबरच महाराष्ट्र शासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात सुलेखा जोशी यांना उत्कृष्ट समन्वयक तर रूबी हॉल रूग्णालय यांना उत्कृष्ट रूग्णालयाचा पुरस्कार देण्यात आला. अवयव प्रत्यारोपण समितीच्या माजी सचिव श्रीमती सुजाता पटवर्धन या उपस्थित होत्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
राज्य शासनाने प्रथमच राबविलेल्या या अभियानाच्या यशाबद्दल वैद्यकीय शिक्षण  मंत्री श्री. गिरीष महाजन यांनी सांगितले की, राज्यात तसेच देशात अनेक रूग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मृत रुग्णांच्या नातेवाईकांत अनेक गैरसमज असल्याने ते मृत अवस्थेतील रूग्णाचे अवयवदान करीत नाहीत. तसेच मृत व्यक्तीचेही अवयव दान करण्याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. याबाबतच प्रबोधन करण्याचा राज्य शासनाने अनोखा प्रयत्न केला असून, त्यात शासनास यश प्राप्त झाले आहे. आता, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयातही अवयवदान करण्यासाठीची सोय करण्यात यावी यासाठी शासन प्रयत्न करेल.

००००

आजरा,राधानगरी,भुदरगड येथील पोलीस स्टेशनचे बांधकाम प्राधान्यक्रमाने पूर्ण करावे - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई,दि.30: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड येथील पोलीस स्टेशन इमारतीचे बांधकाम उपलब्ध निधीनुसार टप्याटप्यानुसार प्राधान्यक्रमाने लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.

मंत्रालयातील दालनात आजरा, राधानगरी, भुदरगड येथील पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत नादुरूस्त असल्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. केसरकर बोलत होते. यावेळी अपर पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण, कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक सतीश माने, गृह विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट, वित्त विभागाचे उपसचिव ज. अ. शेख, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माणचे उपअभियंता बी.एस.जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले की, पोलीस विभागाच्या गृहनिर्माण सोसायटीसाठीच्या बांधकामासाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्रपणे नियोजन करावे. त्यामुळे वेळेत बांधकामे पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यावरदेखील देखभाल,दुरूस्ती नियमितरित्या करण्यात यावी. तसेच राज्यातील नागरीकांच्या सोईसाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात आधुनिक सोईसुविधायुक्त अभ्यागत कक्ष असणे आवश्यक आहे. या अभ्यागत कक्षासाठीचे आधुनिक डिजाइन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तयारी करावी अशी सूचना यावेळी श्री. केसरकर यांनी केली. पोलीस विभागाच्या सक्षमीकरण तसेच सोईसुविधांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

०००००

समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन स्थळावर जेट्टी उभारण्यास लवकरच प्रारंभ करणार - राज्यमंत्री मदन येरावार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 30 : राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत लवकरच जेट्टी उभारण्यास प्रारंभ करणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची जेट्टी उभारण्याबाबत पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी श्री.येरावार बोलत होते. यावेळी एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, पर्यटन विभागाचे सह सचिव दिनेश दळवी, महाराष्ट्र मेरीटाईम् बोर्डाचे मुख्य अभियंता एच.एस.पगारे आदी उपस्थित होते.

श्री. येरावार म्हणाले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे प्रस्तावित केलेल्या 73 जेट्टींपैकी 12 ते 15 जेट्टीची कामे तत्काळ सुरु करावीत. यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व एमटीडीसी यांनी संयुक्तपणे निधी उपलब्ध करुन द्यावा. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अर्नाळा, केळवा/सातपाटी, रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा, दिवे आगार, रेवदंडा, काशिद, रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ, भाटे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला, मालवण (नवीन ठिकाणी), तारकर्ली (स्कुबा ड्रायव्हिंग इन्स्टिट्युट जवळ), मोचेमढ, शिरोडा, मिठाबाव या ठिकाणच्या जेट्टीची कामे अग्रक्रमाने करणार असल्याचे श्री.येरावार यांनी सांगितले.

राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून या किनारपट्टी भागात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यासाठी आणखी जेट्टी उभारण्याच्या प्रस्तावाससुद्धा लवकरच मान्यता मिळणार असल्याचे यावेळी श्री.येरावार यांनी सांगितले.

०००००

पुस्तके माणसाचे आयुष्य समृद्ध करतात - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 : एक हजाराची नोट खर्च केली तर आपल्याजवळ काहीच राहात नाही परंतू एक पुस्तक वाचून ते दुसऱ्याला दिले तर त्यातील ज्ञान आपल्या सोबत राहाते, पुस्तकांनी माणसाचं आयुष्य अधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

काल मुंबईत संपन्न झालेल्या चौदाव्या रेमंड क्रॉसवर्ड बुक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी गुलजार, शेखर गुप्ता, श्रीमती अनुपमा चोप्रा, ट्विंकल खन्ना, यांच्यासह क्रॉसवर्ड बूक समूहाशी संबंधित व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते हेल्थ ॲण्ड फिटनेस गटातील पुरस्कार श्रीमती पायल गिडवानी यांना त्यांच्या बॉडी गॉडेसेस, द कंपलिट गाईड ऑन योगा फॉर विमेनया पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी मेधा देशमुख- भास्करन यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचे प्रकाशन ही करण्यात आले. कार्यक्रमात गुलजार यांच्या हस्ते रस्कीन बॉण्ड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर विविध दहा गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले.

पुस्तकांसाठी लागणारा कागद वन विभागाच्या झाडांपासून मिळत असल्याने पुस्तकांचे विश्व अधिक संपन्न राहावे याची काळजी वन विभाग घेत आहे. त्याकरिता वन विभागाने लोकसहभागातून दि. १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी ८२ लाख झाडे लावली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आपण जर दोन रुपये कमवत असू तर त्यातील एक रुपया हा पोटासाठी आणि १ रुपया हा पुस्तकांसाठी खर्च केला पाहिजे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. पुस्तकांचे मानवी आयुष्यातील महत्व लक्षात घेऊनच वन विभागाने विभागाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके देऊन स्वागत करण्याची प्रथा रुढ केली. ते पुढे म्हणाले की, लोकांना आज त्यांच्या जीवनात निर्मळ आनंद हवा आहे. तो आनंद पुस्तकेच देऊ शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण असून या संस्कृतीला प्रवाही ठेवण्याचे काम पुस्तकांनी अतिशय सहजरीत्या पूर्ण केले, करत आहेत आणि भविष्यात ही करत राहतील.

ज्येष्ठ कवी गुलजार यांनी रस्किन बॉण्ड यांच्या वैविध्यपूर्ण शैलीतील लिखाणाचा यावेळी गौरव केला.

००००

महिला अत्याचार प्रकरणांतील गुन्हा सिद्धतेचे प्रमाण आणखी वाढावे - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई दि. ३० : राज्यातील गुन्हा सिद्धतेचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ५२ टक्के इतके वाढले असले तरी महिला अत्याचार प्रकरणांतील गुन्हा‍ सिद्धतेचे प्रमाण आणखी वाढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या छळास प्रतिबंधया विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन आज वित्तमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग आणि सीआयआयची इंडियन विमेन नेटवर्क शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य रेखा शर्मा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, रेयान इंटरनॅशनल समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ग्रेस पिंटो, दिनेश हारसुलकर यांच्यासह गृह विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

व्यवस्थेत दोषी लोक गुन्ह्यातून सुटले तर त्यांचे धैर्य आणखी वाढते, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. निर्भया केसनंतर यासंबंधीचे कायदे  अधिक कडक करण्यात आले आहेत. मुद्रा बँक योजनेतून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग अधिक प्रशस्त केले आहेत. असे असले तरी कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होत असेल तर त्या महिलेने किंवा तिच्या सहकाऱ्यांनी गप्प बसणे चूकीचे आहे, तिच्यावरील अत्याचाराविरूद्ध सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवताना व्यवस्थेने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. यामध्ये महिला आयोगाची भूमिका महत्वाची असून महिलाविषयक कायद्यांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना कायद्याची ताकद प्रदान करण्याचे काम आयोगाने करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, महिला जिथे कुठे काम करत असतील तिथे सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी  कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळास प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्त्वात आला आहे, त्याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करणे हे प्रत्येक आस्थापनेचे कर्तव्य आहे. कायदे किती आहेत यापेक्षा कायद्यांचा उपयोग कितीजणाना झाला ही बाब आणि समाजाची मानसिकता अधिक महत्वाची आहे. एखाद्या महिलेवर अन्याय झाल्यानंतर  हे माझ्या  नशिबात होते  असे म्हणून  नशिबावर सोडून देणे खूपच चूकीचे असल्याचे ही त्यांनी सांगितले. महिलांसाठी आवश्यक असलेले कोणते कायदे भविष्यात करणे अपेक्षित आहे या तसेच प्रचलित कायद्यातील सुधारणांबाबत आयोगाने आजच्या कार्यशाळेत चर्चा करावी असे ही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

८० दिवसात १४२ कार्यक्रम

महिलांविषयक कायद्यांची माहिती देण्यासाठी आयोगाने ८० दिवसात १४२ कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया राहाटकर यांनी यावेळी दिली. त्या म्हणाल्या की आयोगाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे  शाखा आहेत, परंतू गावखेड्यातील, वस्ती-तांड्यावरील अत्याचारित महिलेला मुंबईत येऊन न्याय मागणे शक्य नसल्याने आयोगाने सुरुवातीला सहा महसूल विभागातील १२ जिल्ह्यात जाऊन काम सुरु केले आहे. येथे शासनातील सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहात असल्याने तक्रारींचे निवारण तिथल्या तिथे करणे शक्य झाल्याचेही त्या म्हणाल्या. आपल्या भाषणात श्रीमती रहाटकर यांनी आयोगाच्या कामाचे स्वरूपही विशद केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांसह इतर प्रमुख मान्यवरांनी यावेळी या कायद्याचे स्वरूप आणि अंमलबजावणीची माहिती उपस्थितांना दिली.       

०००००