प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 29 : रब्बी हंगाम सन 2016-17 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार असून या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2016 पर्यंन्त आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे

राज्यातील सर्व अधिसूचीत पिकांकरिता या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर, 2016 असून सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी पिकाकरिता दि. 30 नोव्हेंबर, 2016 अशी आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाणार असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहीत केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे. या योजनेसाठी नॅशनल इंशुरन्स कंपनी लि., मंडल कार्यालय, तिसरा मजला, स्टर्लिंग सिनेमा बिल्डिंग, 65, मर्झबान रोड, मुंबई 400 001, टोल फ्रि क्र. 1800 200 7710 यांना कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम तपशील खालीलप्रमाणे.
पिकाचे नाव व विमा संरक्षित रक्कम (रू./हेक्टर)-
गहू बागायत -33000, गहू जिरायत - 30000, ज्वारी बागायत- 26000, ज्वारी जिरायत- 24000, हरभरा-24000, करडई-22000, सूर्यफूल-22000, उन्हाळी भात-, उन्हाळी भुईमूग-, रब्बी कांदा -60000 अशी आहे.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान :
या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि, रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रति हेक्टरी विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे.

पिके व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता :- अन्नधान्य व गळीत धान्य पिके- विमा संरक्षीत रक्कमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.  नगदी पिके (कांदा)- विमा संरक्षीत रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते असे असणार आहे.

योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल आणि हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाणार आहे.

जिल्हानिहाय, पिकनिहाय विमा संरक्षित रक्कमविमा हप्ता दर, विमा हप्ता अनुदान इ. बाबतच्या अधिक तपशील शासन निर्णय क्र प्रपिवियो-2016/प्रक्र 208/11अे, 29.10.2016 मधील प्रपत्र अ-1 ते अ-34 मध्ये नमुद केला आहे.

या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी तसेच संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
००००

काशीबाई थोरात/विसंअ/29/10/16.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा