कोकणात तेल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यास केंद्र व राज्याची सहमती - मुख्यमंत्री फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नवी दिल्ली, 30 : कोकणात तेल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्री धर्मेद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सहमती झाली. या संदर्भात सविस्तर प्रकल्पअहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना श्री प्रधान यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या. 

             मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज  शास्त्री भवनात  श्री. धर्मेद्र प्रधान यांची भेट घेतली. या भेटी नंतर त्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती  दिली. बैठकीत श्री.प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेसमोर कोकणात पश्चिम किनारपटटी तेल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहमती दर्शविली. तेल शुध्दीकरण प्रकल्प  उभारण्यासाठी जागेच्या पर्यायाबाबत चर्चा झाली. कोकणातील हा तेल शुध्दीकरण प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. यामुळे देशाची इंधन क्षमता वाढणार आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यावर तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  येत्या एक महिन्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये बैठक होणार असून, तेलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर समांतर गॅस पाईपलाईन उभारण्यास सहमती

             राज्यात प्रस्तावित असलेल्या मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर समांतर गॅस पाईपलाईन उभारण्या संदर्भातही केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्री धर्मेद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात  सहमती झाली. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर समांतर गॅस पाईपलाईन उभारण्यात यावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेवला. त्यास श्री. प्रधान यांनी सहमती दर्शवली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, या गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी गॅसचा उपयोग करता येणार आहे. ही पाईपलाईन जवळपास 700 किलोमीटर लांबीची  असणार असून यामुळे देशातील पूर्व व दक्षिणेकडील राज्यांना जोडता येणार आहे. येत्या काळात केंद्र  व राज्य सरकारच्या संबंधित विभागाचे उच्चअधिकारी यांच्यात बैठक होणार असून बैठकीत या प्रकल्पाचे प्रारुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

               या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव प्रवीण परदेशी, केंद्रीय पेट्रोलियम व वायु मंत्रालयाच्या तेल शुध्दीकरण विभागाचे सहसचिव पौंड्रीक, महाराष्ट्र सदनाच्या आयुक्त  तथा सचिव आभा शुक्ला,गुंतवणूक आयुक्त  लोकेश चंद्र उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा