मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत २ हजार वाहनक्षमतेचे सुसज्ज वाहनतळ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जागांची पाहणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

         मुंबई, दि. ३० : वर्सोवा पुलाचे काम व त्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्याकरिता गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे १४ एकर जागेवर २००० गाड्या उभ्या राहू शकतील एवढ्या क्षमतेचे वाहनतळ सोमवारपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. 

दापचारी आणि आच्छाड येथील दुग्धविकास आणि आरटीओ यांच्या ४ जागांवर हे  वाहनतळ उभारण्यात येणार असून त्यामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी बायपास, शिळ रास्ता, घोडबंदर,पालघर, वसई तसेच, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे श्री. शिंदे यांनी  सांगितले. तसेच, वाहतूक नियंत्रित करण्याकरिता मनोर फाटा व चिंचोटी येथे कंट्रोल रूम उभारण्यात यावे व त्यांच्या सूचनेनुसार गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करण्याच्या सूचना श्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

        वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे श्री. शिंदे म्हणाले. वर्सोवा पुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ती टाळण्याकरीता विशेष वाहनतळ उभारण्यात येऊन जेएनपीटी व गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करून  रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीएमएसआरडीसीचे अधिकारी पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस अधिकारी तहसीलदार, प्रांत आदी अधिकारी उपस्थित होते.


        वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज असून पोलिसांनी मनुष्यबळ वाढवावे याकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त मनुष्यबळ मिळावे, याकरिता त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले असून त्यांनी होकारही दिला असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. वाहनतळ उभारताना त्याठिकाणी स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयांची सोय करण्यात यावी व ड्रायव्हर यांना अंघोळीकरिता हौद बांधण्यात यावा, असेही ते म्हणाले. तसेच, रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर देखील राबवण्यात यावे जेणेकरून या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना कोणताही अडथळा होऊ नये, असे श्री. शिंदे यावेळी म्हणाले.  वाहने रस्त्यावर आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा