भारतीय स्वच्छता परिषदेत राज्याचा गौरव, विशेष अनुदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 :  नवी दिल्ली येथे आज झालेल्या ‘इंडोसॅन’ या भारतीय स्वच्छता परिषदेत महाराष्ट्राने याबाबत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा गौरव झाला. पुणे शहराचा स्वच्छ शहर म्हणून, तर  सिंधुदूर्ग जिल्ह्यास स्वच्छ जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासह अमृत अभियानातील नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी राज्याला 45 कोटी रुपयांचे विशेष अनुदान जाहीर करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विज्ञान भवनात ‘इंडोसॅन’ ही भारतीय स्वच्छता परिषद घेण्यात आली. या परिषदेस केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.या एक दिवसीय परिषदेत स्वच्छ भारत अभियानामुळे देशात घडून येत असलेल्या बदलांसंबंधी चर्चा झाली. त्यात अंमलबजावणी दरम्यान आलेल्या अनुभवांची देवाणघेवाणस्वच्छतेच्या क्षेत्रात येत असलेले नवीन तंत्रज्ञानघनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छ भारत मिशनची देखरेख प्रणाली याबाबत विचारमंथन झाले. पुण्यातील कचरावेचक संघटनेच्या मॉडेलचाही या परिषदेत गौरव झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात लक्षणीय कामगिरी करुन राज्याला देशात अव्वल करण्यात योगदान देणाऱ्या कामगिरीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अमृत अभियानासाठी विशेष अनुदान दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

नागपूर-मुंबई गॅस पाईपलाईनसाठी प्रस्ताव
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत गॅस पाईपलाईन टाकण्यासंदर्भात विस्तृतपणे चर्चा केली. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो मान्यतेसाठी सादर करावाअसे निर्देश श्री. प्रधान यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरी जिल्ह्यात देशातील सर्वांत मोठी तेल रिफायनरी उभारण्यासंदर्भात काही जागा पेट्रोलियम मंत्रालयाने निश्चित केल्या आहेत. त्याबाबत येत्या एक महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होईलअसे यावेळी ठरविण्यात आले.

कोस्टल रोडच्या परवानगी प्रक्रियेला गती
केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांची देखील मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या परवानगी प्रक्रियेला गती देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. एमसीझेडएमए आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन एक महिन्यात अंतिम परवानगीचा प्रश्न मार्गी लागेलअसे आश्वासन श्री. दवे यांनी दिले. तसेच मालाड येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया सुद्धा एक महिन्यात पूर्ण करण्यात येईल,असे आश्वासनही त्यांनी दिले.
                          शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल आभार
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1269 कोटी रूपयांची मदत दिल्याबद्दल आभार मानले. याचा फायदा राज्यातील दुष्काळाची झळ बसलेल्या शेतक-यांना होणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळाबाबत दिलेली पुरवणी मागणी केंद्राने स्वीकारल्या असून देशाच्या इतिहासात राज्य सरकारच्या पुरवण्या मागण्या स्वीकारल्याची पहिलीच घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचा बिमोड करण्यासाठीकेलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर महाराष्ट्र आणि मुंबईत करण्यात आलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचीही भेट घेतली.

महाराष्ट्रातील जवानाला सुरक्षित भारतात आणावे
पाकव्याप्त काश्मिरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील धुळे जिल्हयातील नंदू चव्हाण हे सैनिक अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत गेले आहेत. त्यांना भारतात सुरक्षित परत आणण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांना केली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा