राज्य वन्यजीव मंडळाची बैठक बोलावून हूमन प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि.३१:  राज्य वन्य जीव मंडळाची बैठक बोलावून हूमन प्रकल्पाच्या कामाला आवश्यक असलेली मान्यता घ्यावी व या प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी अशा सूचना आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपरमुख्य सचिव सुनील पोरवाल, प्रधान सचिव व्ही. गिरीराज, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेला हुमन  प्रकल्प हा मोठा प्रकल्प असून यातून विदर्भाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.  हा प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील क्षेत्रात येतो. त्यामुळे या प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता घेणे आवश्यक आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा विषय लवकरात लवकर आणल्यास राज्य वन्यजीवन मंडळाच्या मान्यतेच्या शिफारसीसह हा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या मान्यतेसाठी पाठवणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावास राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करून या कामास गती दिली जावी, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.


आजच्या बैठकीत पळसगाव आमडी उपसा सिंचन योजना, ता. बल्लारपूर- जि. चंद्रपूर या  प्रकल्पासंदर्भात कोटगल बॅरेज, माजी मालगुजारी तलावांचे निकष बदलणे या संदर्भातही चर्चा झाली.  पूर्व विदर्भात ३०० ते ३५० वर्षांपूर्वी बांधलेले साधारणत: ६८६७ मालगुजारी तलाव आहेत. खरीप पीकासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा म्हणून व उन्हाळ्यात पिण्याया पाण्यासाठी या तलावांचा वापर होतो. यापैकी १०० हेक्टर लाभक्षेत्रावरील १३२ माजी मालगुजारी तलाव व्यवस्थापनासाठी जलसंपदा विभागाकडे देण्यात आले आहेत.  भंडाऱ्यातील २८, गोंदियातील ३८चंद्रपूर मधील ५१ आणि गडचिरोली जिल्ह्यातील १५ अशा  एकूण १३२ माजी मालगुजारी तलावांची एकत्रित सिंचन क्षमता २६,९०७ हेक्टर इतकी आहे.  या तलावातील गाळ काढण्याचे तसेच विशेष दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा