संस्कारक्षम शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज -देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनागपूर, दि.31 :  भारतीय संस्कृती आणि नितीशास्त्रासोबतच नवीन माहिती व तंत्रज्ञान देखील आत्मसात करणे आवश्यक आहे. दैनिक हितवादच्या नॉलेज मॅगझिनने सूरु केलेली ही मोहीम शाळा व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक आहे. राज्यातील शाळांमध्ये डिजीटल शिक्षण पद्धती सुरु करण्यात आली असून भविष्यात जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या मराठी शाळांकडे पालक निश्चितपणे वळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे दैनिक हितवादच्या नॉलेज मॅगझिनला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दैनिक हितवादचे प्रबंध संपादक बनवारीलाल पुरोहित, संपादक विजय फणशीकर, सहसंपादक सुभाष देवपुजारी, नॉलेज मॅगझिनच्या संपादक आसावरी शेणोलीकर प्रामुख्याने  उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग होत असल्याचे अभावानेच दिसते. परंतु हितवादने नॉलेज मॅगझिनच्या निमित्ताने सुरु केलेला हा नवीन प्रयोग निश्चितपणे यशस्वी झालेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे सोबतच संस्कृतीविषयीही माहिती देणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान विद्यार्थी उपयोगात आणत असतांना भारतीय संस्कृती आणि नितीमत्ता या दोन्ही गोष्टींची सांगड घालून शिक्षण सुसह्य करण्याची आवश्यकता आहे. समाजात साक्षरतेचे प्रमाण वाढवितांना त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. कारण तमसो मा ज्यो‍र्तिगमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या शिक्षण पद्धतीचा शाळांमधून प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपल्या विचारवंतानी मांडलेल्या चांगल्या कल्पना समाजासमोर आणणे आवश्यक आहे. विज्ञानाधारित समाज निर्मिती करतांना मुलांना वैज्ञानिक निकषांवर आधारित शिक्षणाची गरज आहे. इस्त्राईल सारख्या छोटया देशाने कृषी क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करुन कृषी उत्पादन वाढविले आहे. आता संगणकही शेती करु शकतो हे इस्त्राईलने खरे करुन दाखविले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येत्या 15 ऑगस्टला राज्यात अनेक शासकीय योजना सुरु करण्याचा मानस आहे. 2 ऑक्टोबर पासून 350 सेवा जनतेला डिजीटल ॲपवर उपलब्ध करुन देणार आहोत. हाच खरा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. भ्रमणध्वनीमुळे संपर्काचे मोठे साधन आपल्याला मिळाले आहे.परंतु त्याचे काही दुष्परिणामही समाजात दिसून येतात. विद्यार्थी यावर गेम खेळतात तसेच इतर गोष्टीही बघतात. या तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलांवर शाळेतच मुल्याधारित संस्कार करण्याची प्राचार्य व शिक्षकावर जबाबदारी  आहे. चांगले मुल्य शिक्षण नॉलेज मॅगझिनच्या माध्यमातून आपण निश्चितपणे देऊ शकू अशी खात्रीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशातील 6 लाख गावे रस्त्याने जोडण्याची योजना राबविली होती. त्यामुळे गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा नागरिकांना मिळतात. यासोबतच त्यांनी उत्पादीत केलेल्या कृषी मालाला मोठया शहरात नेण्याची सोयही होते. एक रस्ता अनेक आर्थिक सुधारणांशी निगडीत आहे. त्यामुळे शासनाने कम्युनिकेशन एक्सप्रेस हायवे ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहय जगामध्ये विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती डिजीटल पद्धतीने होण्यासाठी गेल्या महिन्यात शाळांतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे यानिमित्ताने त्यांना देण्यात आली. शिक्षण हे सर्वसमावेशक असावे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी शासन तर प्रयत्नशील आहेच, सोबतच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थाचेही सहकार्य आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक हितवादचे प्रबंध संपादक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या भाषणात हितवादने सुरु केलेले नॉलेज मॅगझिन राष्ट्रनिर्माणासाठी  काम करीत आहे.अत्यंत उज्जवल परंपरा लाभलेल्या दैनिक हितवाद महात्मा गांधी यांचे गुरु गोपाल कृष्ण गोखले यांनी सुरु केले. नितिमत्ता व संस्कृती यांची जोपासना व भ्रष्टाचारावर प्रहार करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. सर्व धर्मात प्रेम व सद् भावना वाढीस लागावी, ही प्रेरणा जोपासून या क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत, असे सांगितले.
दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हितवाद नॉलेज मॅगझिन 11 वर्षे पूर्ण करीत आहे. मुलांसाठी काहीतरी वेगळे करावे ही प्रेरणा घेऊन सुरुवात केली. यासाठी विविध विद्यालयांच्या प्राचार्याशी चर्चा करुन त्याचे स्वरुप कसे असावे त्यात मजकूर काय असावा ? याबाबत चर्चा झाली. विद्यालयांनीही ही कल्पना उचलून धरली. आता या मॅगझिनच्या लाखो प्रती विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात येतात. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे. डॉ. अब्दुल कलाम, सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, यांच्या मोठया होण्यामागील परिश्रम विद्यार्थ्यांना सांगितले जातात. राजकीय व व्यावहारीक दृष्टीकोनाच्या पलीकडे जाऊन हे काम हाती घेतले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही चांगले साहित्य वाचण्याची सवय लागली असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन करुन गोपाल कृष्ण गोखले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. स्वागत विजय फणशीकर यांनी केले. या  समारंभास  प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा