जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच अधिकारी -कर्मचारी यांचे वेतन करण्यात येईल,असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक पालकमंत्री श्री. .बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय खोडके, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, केवलराम काळे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, येत्या एक ऑगस्टपासून सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिकचा वापर सुरू करावा. वैद्यकीय अधिकारी बरेचदा मुख्यालय नसल्यामुळे रुग्णांना समस्या भेडसावतात. यापुढे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात राहून त्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी पार पाडावी. जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध समस्या आहेत. त्या समस्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी येत्या गुरुवारी आरोग्यमंत्र्यांकडे अमरावती जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत बैठक लावण्यात आली आहे. तेथे सर्व तालुके अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांना असलेल्या समस्या मांडव्यात. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा शासनापासून आवश्यक असलेली सर्व आवश्यक मदत पुरवण्यात येईल. आरोग्य विभागाच्या तक्रारीवर वेळीच खुलासा सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या भागातील आमदार, लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून  आरोग्यविषयक अडचणी सांगाव्यात. स्थानिक पातळीवर सोडविता येणाऱ्या अडचणी असल्यास त्या तेथेच सोडवाव्यात. नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविताना कोणतीही हयगय होऊ नये. गाव पातळीवर चर्चा करून, संवाद साधून नागरिकांच्या आरोग्यविषयक अपेक्षाही समजून घ्याव्यात, असेही ते यावेळी म्हणाले.