सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व  समाजभूषण, गुणवंत विद्यार्थी सोहळा

अमरावती ‘ दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व  समाजभूषण, गुणवंत विद्यार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी  रामदास तडस, जगदीश गुप्ता, कैलास गिरोळकर, मयूर जीरापुरे, कैलास गिरोळकर, छाया गिरोळकर, मयूर जीरापुरे आधी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रोजगार निर्मिती प्रक्रियेला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट काम केलेल्यांचा गौरव करणे अशा कार्यक्रमामुळे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून समाज बांधवांना प्रोत्साहन द्यावे. जगातील जवळपास १७० देश आज वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. अन्य देशांकडे काम करण्यासाठी पुरेशी सक्षम युवा पिढी नाही. यामुळे आपल्याकडील युवा पिढीला जगातील रोजगाराची अनेक नवीन दालने खुली आहेत.  यासाठी नवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेला व संस्कारी युवावर्ग जगाला पुरवण्याची जबाबदारी भारताची आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. आजची युवा पिढी व्यसनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत 2047’ घडविण्यासाठी आतापासून नियोजन सुरू केले आहे. विकसित भारताचा संकल्प हा समाजाच्या विकासाचा संकल्प आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचणे आणि या विकासगंगेत सर्वांचा समावेश असणे हे विकसित भारताचे ध्येय आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमस्थळी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी रिमोटची कळ दाबून ‘कैलास छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्ट’चे विमोचन केले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.