गरजू रूग्णांसाठी संजीवनी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

राज्यातील गरजू व गोरगरीब जनतेला दुर्धर आजारामध्ये उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा जणू संजीवनी ठरला आहे. विदर्भातील गरजू व पात्र रूग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारा मुख्यमंत्री सचिवालय हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षही मोलाचा ठरत आहे. जानेवारी २०१७ ते जून २०२५ पर्यंत या कक्षाद्वारे ११ हजार ८४९ रूग्णांना ९९ कोटी ४६ लाख ९४ हजार ४१ रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

विदर्भातील गोरगरीब रुग्णांना नागपुरातच हे अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना झाली. सहाय्यता निधी प्राप्त करण्याकरिता संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई येथे अर्ज सादर करण्याच्या गैरसोयीतूनही त्यांची सुटका झाली.  हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील गरजू व पात्र रुग्ण गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्याकरिता येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते. जानेवारी २०१७ पासून या कक्षातून प्रत्यक्ष रुग्णांना उपचारासाठी निधी उपलब्ध होत आहे.

जानेवारी २०१७ ते जून २०२५पर्यंत रूग्णांना ९९ कोटी ४६ लाखांची मदत

हैद्राबाद हाऊस स्थित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे ११ हजार ८४९ रूग्णांना ९९ कोटी ४६ लाख ९४ हजार ४१ रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. या कक्षाद्वारे सर्वप्रथम १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ दरम्यान ३३२ रूग्णांना ३ कोटी २३ लाख ११ हजार ५०० रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. तर १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात १७७६ रूग्णांना १९ कोटी ५ लाख ६४ हजारांचे , १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत २०९९ रूग्णांना २० कोटी १ लाख ६२ हजार ७००, १ एप्रिल २०१९ ते ७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ९७१ रूग्णांना ७ कोटी ४ लाख २५ हजार, ३१ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत २८३ रूग्णांना १ कोटी ६ लाख ८५ हजार ९४१, १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत  ५४९ रूग्णांना २ कोटी ३७ लाख ९९ हजार ५००, १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ४८२ रूग्णांना २ कोटी २७ लाख २२ हजार ५००, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ८३६ रूग्णांना ५ कोटी ६४ लाख ३६ हजार, १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत २००५ रूग्णांना १६ कोटी ३३ लाख ९७ हजार ५००, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत २०८२ रूग्णांना १७ कोटी ८० लाख ७५ हजार ४०० आणि १ एप्रिल ते ३० जून २०२५ पर्यंत ५३४ रूग्णांना ४ कोटी ६१ लाख १४ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले.

असा आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी उपक्रम

महाराष्ट्रातील गरजू व पात्र रूग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदतीचा हातभार लावण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने सुरू केलेला हा लोकोपयोगी व महत्वाकांक्षी उपक्रम आहे.

योजनेसाठी पात्रता व निकष

या उपक्रमाचा लाभ घेण्याकरिता अर्जदारांना महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न १.६० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. रूग्णाकडे रेशन कार्ड व आधार कार्ड असणेही गरजेचे आहे. उपचार घेत असलेले रूग्णालय महाराष्ट्र राज्यामधील असणे आवश्यक असून रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक असते.

या आजारांवरील उपचारासाठी मिळते मदत

या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत काही ठराविक आजार चिन्हित करण्यात आले आहे. यामध्ये कॉकलियर ईम्प्लांट (वय ३ वर्षांपर्यंत), ह्रदय/यकृत/किडणी/फुप्फुस/बोन मॅरो आणि हाताचे प्रत्यारोपण, कर्करोग/रस्ते अपघात/लहान बालकांची शस्त्रक्रिया/मेंदुरोग/ ह्रदयरोग आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरी यासह डायलिसिस/केमोथेरेपी/रेडिएशन/नवजात शिशुंचे आजार/गुडघ्याचे प्रत्यारोपण/भाजलेले रूग्ण/अस्थीबंधन आणि विद्युत अपघात यांचा समावेश होतो.

या कागदपत्रांची लागते आवश्यकता

या वैद्यकीय कक्षाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रकाची मूळप्रत, डॉक्टरांच्या सहि व शिक्यासह (खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडुन प्रमाणीत करणे आवश्यक आहे), तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. १.६० लक्ष पेक्षा कमी), रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे)/नवजात बाळासाठी आईचे आधारकार्ड आवश्यक आहे, रुग्णाचे रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्याचे), संबधीत आजाराचे रिपोर्ट (ईन्व्हेस्टिगेशन रिपोर्टस) असणे आवश्यक, रुग्णाचा पासपोर्ट फोटो, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी/ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे, रस्ते अपघात असल्यास एफआयआर ची प्रत जोडणे आवश्यक आहे.

असा करता येईल अर्ज

विहीत नमुन्यात मुळ अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय हैद्रबाद हाऊस, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लाभासाठी रूग्णालयाची अट

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रूगणालय हे नोंदणीकृत असणे गरजेचे असून संबंधित रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक आहे. रूग्णालयामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना/आयुष्यमान भारत योजना/धर्मदाय रूग्णालय/आरबीएसके इत्यादी योजना कार्यान्वीत असल्यास या योजनांमधून रूग्णाचा उपचार होणे बंधनकारक आहे व रूग्णाचा आजार या योजनेमध्ये बसत नसल्यास तसे प्रमाणपत्र खर्चाच्या अंदाजपत्रकासोबत जोडणे आवश्यक आहे.

किती रकमेपर्यंत मिळू शकते मदत

रूग्णाच्या आजाराचे व उपचाराचे स्वरूप, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट याचे अवलोकन करून कार्यकारीणी समिती नियमाप्रमाणे निर्णय घेत जास्तीत जास्त 2 लाखांचे अर्थसहाय्य ह्रदय/यकृत/किडणी/फुप्फुस आणि बोन मॅरो प्रत्यारोपणाकरिता करण्यात येते.

गरजू व गरीब जनतेला दुर्धर आजाराच्यावेळी  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे देण्यात येणारी मदत ही बहुमोलाची ठरत आहे. जास्तीत-जास्त गरजुंपर्यंत हा लाभ पोहचावा या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. याची प्रचिती विदर्भातील जनतेला आली आहे या मदतीबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसून येत आहे.

 

रितेश मो. भुयार,

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.