मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांच्या परवानगीबाबत समिती स्थापन

मुंबई, दि. 29 : मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांची संख्या व प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी  दिल्लीप्रमाणे पेट्रोल व डिझेल वाहनांवर निर्बंध घालण्यात यावे. महानगर क्षेत्रामध्ये केवळ सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांनाच परवानगी देण्यात यावी, या बाबींचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली 7 सदस्यीय समिती 22 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी सुधीरकुमार श्रीवास्तव अध्यक्ष असून राज्याचे परिवहन आयुक्त, सह पोलीस आयुक्त (वाहतूक), महानगर गॅस निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, महावितरणचे प्रकल्प संचालक, एसआयएएम (SIAM) चे अध्यक्ष सदस्य आहेत. तर सह परिवहन आयुक्त (अंमल – 1) सदस्य सचिव असणार आहेत.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी व वाढते प्रदूषण याबाबत उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका प्रकरणी 9 जानेवारी 2025 रोजी ‍दिलेल्या आदेशान्वये समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी व वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून केवळ सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांनाच परवानगी देण्याविषयी अभ्यास करून तीन महिन्यात शिफारशींसह शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे, असे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.

नीलेश तायडे/विसंअ/